अहेरी तालुक्यात चक्रीवादळाचा हाहाकार: गारपीट आणि पावसाने जनजीवन विस्कळीत

अहेरी, २९ एप्रिल : अहेरी तालुक्यात सायंकाळी आलेल्या चक्रीवादळ, मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अहेरी, आलापल्ली आणि नागेपल्ली परिसरात या नैसर्गिक आपत्तीने जनजीवन विस्कळीत झाले. शेती, घर आणि वाहनांचे नुकसान झाले असून, स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.
सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट सुरू झाली. वादळामुळे मोठी झाडे उन्मळून रस्त्यांवर पडली, घरे आणि दुकानांची छपरे उडाली. एका घराचे छप्पर रस्त्यावरील ट्रकवर आदळल्याने ट्रकच्या काचा तुटल्या. नागेपल्लीत अनेक घरांची छपरे खराब झाली. गारपिटीमुळे वाहनांच्या काचांचेही नुकसान झाले.
शेतीप्रधान अहेरी तालुक्यात भात, मिरची पिकांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीमुळे काही शेतांमधील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
जिल्हा प्रशासनाने तातडीने पथके पाठवून नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. हवामान खात्याने पुढील २४ तासांत पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे. स्थानिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांनी केले.
नागरिकांनी तातडीने मदत आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे. प्रशासनाने रस्त्यावरील मलबा हटवण्यास सुरुवात केली आहे. या आपत्तीने अहेरी तालुक्याला मोठा फटका बसला असून प्रशासनासमोर मोठे आवाहन उभे झाले आहे.