गडचिरोलीच्या राजकारणात आजाद समाज पार्टीचा नवा अजेंडा: विजयासाठी रणनीतिक तयारी

“आजाद समाज पार्टीचा गडचिरोलीत निवडणूक रणनीतीवर जोर: “जातीचे राजकारण नको, विजय हाच ध्यास”
गडचिरोली, 16 मे : गडचिरोली विश्रामगृहात आजाद समाज पार्टीच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आणि पक्ष विस्तारावर सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्र प्रभारी रुपेश बागेश्वर यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आणि जातीच्या राजकारणाला थारा न देण्याचे आवाहन केले. पक्षाने अल्पावधीत गडचिरोलीच्या राजकारणात निर्माण केलेल्या प्रभावाची प्रशंसा करत, भाई चंद्रशेखर आजाद यांचे विशेष लक्ष जिल्ह्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी कार्यकर्त्यांना गट-तट विसरून निवडणुका जिंकण्याचा अंतिम उद्देश ठेवण्यास सांगितले. “जयंत्या आणि उत्सव साजरे करणे म्हणजे राजकारण नव्हे. फुले-आंबेडकरी चळवळीत सभा-सोहळ्यांचा ट्रेंड आहे, पण त्याने निवडणुका जिंकता येत नाहीत,” अशी कानटोचणी त्यांनी कार्यकर्त्यांना केली. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या ग्रामपंचायतीत निवडणुकीची तयारी करावी, असेही त्यांनी आवाहन केले.
उमेदवार निवड समिती गठीत, नव्या नियुक्त्या जाहीर
बैठकीत उमेदवार निवड समिती स्थापन करण्यात आली, ज्याचे अध्यक्षपद प्रदेश महासचिव डॉ. जे. बी. रामटेके यांच्याकडे आहे. समितीत विदर्भ अध्यक्ष नितीन नागदेवते, प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, प्रभारी हंसराज उराडे, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड आणि उपाध्यक्ष खुशाल मरसकोल्हे यांचा समावेश आहे.
जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांच्या फेलोशिप दौऱ्यामुळे त्यांच्या जागी युवा आदिवासी चेहरा म्हणून खुशाल मरसकोल्हे यांना गडचिरोली विधानसभा प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. तसेच, हंसराज उराडे यांची सक्रिय कामगिरी पाहता त्यांना जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले.
पक्षाची तयारी आणि प्रभाव
बागेश्वर यांनी सांगितले की, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांच्या नेतृत्वात आणि सक्रिय पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पक्षाने गडचिरोलीत मजबूत पाय रोवले आहेत. विशिष्ट समीकरणे बनवून निवडणुका लढण्याचे आदेशही त्यांनी दिले. बैठकीला जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, प्रवक्ते प्रितेश अंबादे, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, युवा आघाडी अध्यक्ष विवेक खोब्रागडे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गवार, गडचिरोली शहराध्यक्ष आशिष गेडाम, महिला अध्यक्ष सविता बांबोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
“आजाद समाज पार्टीने गडचिरोलीत निवडणूक केंद्रित राजकारणावर भर देत आपली ताकद वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.”