गडचिरोली: फरार दारू माफियांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, कुडकेली जंगलातील विषारी बनावट दारू कारखाना प्रकरणात मोठी कारवाई

गडचिरोली, १६ मे : भामरागड तालुक्यातील कुडकेलीच्या नक्षलग्रस्त जंगलात लपलेल्या विषारी बनावट दारू कारखान्याच्या प्रकरणात फरार असलेल्या कुख्यात दारू माफिया धर्मा निमाय रॉय (३८, चामोर्शी) आणि त्याचा साथीदार शुभम सपन बिश्वास (२६, ताडगाव) यांना गडचिरोली पोलिसांनी अखेर जेरबंद केले. १४ मे रोजी रात्री सुरू झालेल्या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी ४० लाखांचा मुद्देमाल, यात १३ लाखांचे ४,५०० लिटर विषारी स्पिरीट आणि ८,७०० बनावट दारूच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी धुळे येथील चार अन्य आरोपींना यापूर्वीच अटक झाली होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतिश देशमुख आणि एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अरुण फेगडे आणि ताडगाव पोलिसांनी पार पाडली.
गुप्त माहितीवर सापळा, फरार आरोपी गजाआड
गडचिरोलीत दारूबंदी असूनही तस्करी फोफावली आहे. १४ मे रोजी कुडकेली जंगलात बनावट दारू कारखाना असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. नक्षलग्रस्त भागात शिताफीने सापळा रचून पोलिसांनी रात्री कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच रॉय आणि बिश्वास यांनी जंगलाचा फायदा घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी घनदाट जंगलात रात्र जागून आणि जीव धोक्यात घालून त्यांना अटक केली. यापूर्वी धुळे येथील वसंत प्रदान पावरा (१९), शिवदास अमरसिंग पावरा (३५), अर्जुन तोयाराम अहिरे (३०), आणि रविंद्र नारायण पावरा (१८) यांना अटक झाली होती.
४० लाखांचा विषारी मुद्देमाल जप्त
१५ मे रोजी सकाळी पंचनाम्यासह छाप्यात पोलिसांनी कारखाना उद्ध्वस्त केला. जप्त मुद्देमालात ४,५०० लिटर विषारी स्पिरीट (१३ लाख ६४ हजार रुपये), ८,७०० बनावट दारूच्या बाटल्या, ड्रम, होंडा ब्रिओ कार, मोटारसायकल, जनरेटर आणि सिलिंग मशीन यांचा समावेश आहे. ही विषारी दारू बाजारात पोहोचली असती तर मोठा अनर्थ घडला असता, असे पोलिसांनी सांगितले.
धर्मा रॉय: तस्करीचा मास्टरमाइंड
धर्मा रॉय हा दक्षिण गडचिरोलीतील दारू तस्करीचा किंगपिन आहे. गेल्या २५ वर्षांत त्याच्यावर १५ गुन्हे दाखल असून, पहिला गुन्हा २००० मध्ये नोंदला गेला. राजकीय पाठबळ आणि पोलीस खात्यातील संपर्कांमुळे तो वारंवार सुटका करायचा. छोट्या तस्करीपासून सुरुवात करून त्याने कोट्यवधींची संपत्ती जमवली. मात्र, नीलोत्पल यांच्या कठोर कारवाईने त्याला अखेर गजाआड केले.
पोलिसांचे धैर्य आणि सतर्कता
नक्षलग्रस्त जंगलातील ही कारवाई पोलिसांच्या धैर्याचे आणि सतर्कतेचे उदाहरण आहे. “अवैध तस्करीविरोधात आमची मोहीम सुरू राहील,” असे नीलोत्पल यांनी ठणकावले. ताडगाव पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल असून, तपास सुरू आहे. या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, विषारी दारूच्या धोक्यापासून मोठा अनर्थ टळला आहे.