वाघेडा येथे पशुसंवर्धन दिनानिमित्त यशस्वी पशुधन आरोग्य शिबिर

कुरखेडा, 20 मे : महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन खात्याच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही 20 मे रोजी तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय कुरखेडाच्या वतीने वाघेडा गावात पशुधन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मानवी जीवनात दूध, अंडी, चिकन, मटण यांसारख्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी उपलब्ध करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय सेवा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील असतात. या शिबिरात गावातील शेळ्यांचे लसीकरण, लहान कालवडी आणि मोठ्या जनावरांना लंपी आजाराचे लसीकरण, तसेच घरगुती कुत्र्यांना रेबीजचे लसीकरण करण्यात आले. याशिवाय आजारी जनावरांवर औषधोपचारही करण्यात आले. गावातील पशुपालकांनी शिबिराला उत्स्फूर्त सहकार्य केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ. देवेंद्र मेश्राम, पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपमाला दवंडे, पूर्णानंद नेवारे, कर्मचारी बी. बी. पेंदोर, तसेच पशुसखी मडकाम आणि राऊत यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली.
हे शिबिर पशुपालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले असून, पशुसंवर्धन विभागाच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित झाले.