गर्भलिंग निदानाविरुद्ध मोहीम: माहिती देणाऱ्यास १ लाखांचा पुरस्कार!

गडचिरोली, दि. २० मे : गडचिरोली जिल्हा प्रशासनाने गर्भलिंग निदानाविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. गर्भधारणेपूर्व किंवा प्रसवपूर्व गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांविरुद्ध माहिती देणाऱ्या व्यक्तीला तब्बल १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे.
गर्भलिंग निदान आणि गर्भपातास सहकार्य करणे हा गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा १९९४ आणि सुधारित कायदा २००३ अंतर्गत गंभीर गुन्हा आहे. दोषी आढळल्यास संबंधित डॉक्टर, तांत्रिक कर्मचारी किंवा इतर व्यक्तींना १ लाख रुपये दंड आणि २ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा केंद्रांविरुद्ध माहिती पुढे आणावी. ही माहिती कोणत्याही व्यक्तीकडून, मग ती सामान्य नागरिक, अधिकारी किंवा कर्मचारी असो, स्वीकारली जाईल.
माहिती देण्यासाठी संपर्क:
– हेल्पलाइन : १८००२३३४४५४५ / १०४
– वेबसाइट : http://amchimulagimaha.in
– थेट संपर्क : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली
“जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी सांगितले, “गर्भलिंग निदानासारख्या सामाजिक गुन्ह्यांविरुद्ध लढण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे आणि समाजहितासाठी आपले योगदान द्यावे.” या मोहिमेद्वारे गडचिरोली प्रशासनाने लिंगभेदाला आळा घालण्यासाठी ठोस पाऊल उचलले आहे.”