May 21, 2025

माओवाद्यांचा ‘मास्टरमाइंड’ संपला: बसव राजू मुठभेडीत ठार

गडचिरोली, २१ मे : छत्तीसगडच्या अबुझमाड जंगलात आज पहाटे डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिजर्व्ह गार्ड) पोलिस आणि नक्सलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत माओवादी कम्युनिस्ट पार्टीचा सर्वोच्च नेता आणि महासचिव नंबाला केशव रावउर्फ गगन्ना उर्फ बसव राजू ठार झाला. या मुठभेडीत नक्सल प्रवक्ता रुपेश याच्यासह ३० हून अधिक नक्सलवादी मारले गेल्याची माहिती आहे. छत्तीसगड पोलिसांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे.

अबुझमाड मध्ये मोठी कारवाई
नारायणपूर, दंतेवाडा, बीजापूर आणि कोंडागाव येथील डीआरजी पथकांना माड डिव्हीजनमध्ये नक्सलवाद्यांचा मोठा तळ असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर अबुझमाड जंगलात मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सुरू करण्यात आलं. आज पहाटे डीआरजी जवान आणि नक्सलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली, ज्यामध्ये नंबाला केशव राव ठार झाला. यासह नक्सल प्रवक्ता रुपेश याचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

कोण होता नंबाला केशव राव?
७० वर्षीय नंबाला केशव राव याचा जन्म १९५५ मध्ये आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियान्नापेठ गावात झाला. त्याने वारंगल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बी.टेकची पदवी घेतली होती. १९७० पासून तो माओवादी चळवळीत सक्रिय होता. गनिमी युद्ध आणि जेलाटिन स्फोटकांचा वापर करण्यात तो निपुण होता. १९९२ मध्ये तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी)च्या केंद्रीय समितीचा सदस्य बनला. २००४ मध्ये माओवादी कम्युनिस्ट पार्टीच्या स्थापनेनंतर त्याची केंद्रीय लष्करी आयोगाचा प्रमुख आणि पोलिट ब्युरो सदस्य म्हणून नियुक्ती झाली. १० नोव्हेंबर २०१८ रोजी मुप्पाला लक्ष्मण राव उर्फ गणपती याने महासचिवपदाचा राजीनामा दिल्यानंतर नंबाला केशव राव याची महासचिवपदी निवड झाली.

नंबाला केशव रावचा काळा इतिहास
नंबाला केशव राव हा छत्तीसगड, महाराष्ट्र आणि ओडिशामधील अनेक मोठ्या नक्सल हल्ल्यांचा मास्टरमाइंड होता. २०१० मध्ये दंतेवाडा येथे झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ७६ जवान शहीद झाले होते. २०१३ मध्ये जीरम घाटी हल्ल्यात काँग्रेस नेते विद्याचरण शुक्ल, महेंद्र कर्मा, नंदकुमार पटेल यांच्यासह २७ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, २०१८ मध्ये आंध्रप्रदेशातील तेलगू देसम पार्टीचे आमदार किदरी सर्वेश्वर राव आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांची ओडिशा सीमेवर हत्या करण्यात आली होती. या सर्व हल्ल्यांमागे नंबालाचा हात होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) सर्वाधिक वॉंटेड फरार यादीत त्याचे नाव समाविष्ट होते.

पोलिसांचे मोठे यश
ही मुठभेड नक्सलवादाविरुद्धच्या लढाईत एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. नंबाला केशव रावच्या मृत्यूमुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. छत्तीसगड पोलिसांनी या कारवाईसाठी केलेल्या नियोजनाचं आणि धैर्याचं कौतुक होत आहे. या मुठभेडीमुळे नक्सलवाद्यांचे मनोधैर्य खचण्याची शक्यता आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!