“शिक्षकांचा विश्वास, युट्युबचा आधार : आदित्यचा आयआयटी प्रवेशाचा विजयी मार्ग”

गडचिरोलीचा आदित्य ठरला आयआयटीचा मानकरी : जेईई अॅडव्हान्स्ड २०२५ मध्ये मिळवली ५५१४ वी रँक

गडचिरोली, ३ जून : देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेण्यात येणारी जेईई अॅडव्हान्स्ड २०२५ चा निकाल २ जून रोजी जाहीर झाला. यात गडचिरोलीच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केलेल्या आणि मूळ कोरची तालुक्यातील रहिवासी असलेल्या आदित्य इंद्रलाल सहारे याने ५५१४ वी रँक मिळवून आयआयटीत प्रवेश निश्चित केला आहे.

आदित्यने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, त्याने कोणतेही महागडे क्लासेस न लावता, केवळ महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित सराव पेपर आणि युट्युबवरील अभ्यास साहित्याच्या जोरावर हे यश मिळवले. तो दररोज ४ ते ५ तास अभ्यास करत होता. त्याच्या या मेहनतीने आणि समर्पणाने त्याला आयआयटीच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचवले.

स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे संस्थापक सतीश चिचघरे यांनी आदित्यच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करताना म्हटले, “विद्यार्थ्यांचे मूलभूत शिक्षण मजबूत असेल तर कोणतीही परीक्षा अवघड नसते. आदित्यने आमच्या शैक्षणिक तत्त्वांना प्रत्यक्षात उतरवले आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”

आदित्यच्या या यशाने गडचिरोलीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!