October 21, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

श्रीक्षेत्र मार्कंडा: सांस्कृतिक समृद्धीचा माहितीपट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून लोकार्पित

गडचिरोली, ११ जून : गडचिरोली जिल्ह्यातील पवित्र आणि पुरातत्त्वीयदृष्ट्या समृद्ध श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर तीर्थक्षेत्रावर आधारित सहा मिनिटांचा माहितीपट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवन, गडचिरोली येथे नुकताच विमोचित झाला. ‘विदर्भाची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये या माहितीपटात प्रभावीपणे मांडण्यात आली आहेत.

वैनगंगा नदीच्या काठी वसलेल्या या मंदिराचे नागर शैलीतील स्थापत्य, रामायण-महाभारतकालीन कोरीव शिल्पकला आणि पुरातत्त्वीय महत्त्व माहितीपटात अधोरेखित आहे. महाशिवरात्री आणि श्रावण सोमवारी लाखो भाविकांचा भक्तिमय वातावरण, ‘विदर्भाचे खजुराहो’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कलाकृती आणि निसर्गरम्य परिसर यांचे सुंदर चित्रण यात आहे. मंदिर परिसरातील कोरीव शिल्पांच्या कथा, स्थापत्यशास्त्रातील बारकावे आणि ऐतिहासिक संदर्भ यांचा समावेश हा माहितीपट अध्यात्म आणि संस्कृतीचा समृद्ध अनुभव देतो.

जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालयाने हा माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटामुळे मार्कंडा मंदिराची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि पर्यटनाच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त झाला.

विमोचन समारंभाला अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, खासदार नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!