March 7, 2026

अंजनटोला शाळेत शाळा प्रवेशोत्सवाचा जल्लोष; शिक्षणाच्या उज्वल भविष्याचा पाया रचला

कुरखेडा, 24 जून : तालुका कुरखेडा येथील अंजनटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम 24 जून 2025 रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. गावातील पालक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत वडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गावात जंगी मिरवणुकीद्वारे स्वागत करण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि गोड खाऊ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय श्री रामदासजी मसराम साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणाचे महत्त्व विशद केले. “तुमच्या लेकरांचे शिक्षण हेच त्यांचे खरे भांडवल आहे. त्यात कधीही कुचराई करू नका,” असे आवाहन त्यांनी पालकांना केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना सांगितले की, शिक्षणामुळे जीवनात यश आणि समृद्धी प्राप्त होते. यावेळी गटविकास अधिकारी श्री धीरजजी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणाला उज्वल भविष्याचा पाया संबोधले. ते म्हणाले, “उत्तम शिक्षण हे तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. मेहनत आणि समर्पणाने तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.”

कार्यक्रमाला सरपंच सौ. नगीनाताई कसौदी, गटविकास अधिकारी श्री धीरजजी पाटील, बी.इ.ओ. श्री शिवणकर, केंद्रप्रमुख श्री मिसार, पोलीस पाटील श्री पुंडलिकजी नैताम, प्रतिष्ठित व्यक्ती श्री अमरसिंगजी खडाधार, मुख्याध्यापक श्री मोहुर्ले, शिक्षिका सौ. राऊत मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री जगदीशजी मेश्राम, उपाध्यक्ष सौ. संगीताबाई कोरेटी यांच्यासह शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी मिळून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण प्रदान केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तर शिक्षकांनी शिक्षणाचे महत्त्व आणि शाळेच्या प्रगतीबाबत माहिती दिली. शाळा व्यवस्थापन समितीने नवप्रवेशित विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर उपहार देऊन त्यांचे मनोबल वाढवले. गावकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फस्फूर्त प्रतिसाद देत शिक्षणाच्या प्रसारासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त केला.

“शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे,” असे मत मुख्याध्यापक श्री मोहुर्ले यांनी व्यक्त केले. अंजनटोला शाळेने हा प्रवेशोत्सव प्रेम, जबाबदारी आणि उत्साहाने साजरा करत गावातील शिक्षणाच्या प्रगतीसाठी एक नवीन पाऊल टाकले आहे. या स्तुत्य प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, गावाच्या या उपक्रमाला मनःपूर्वक अभिवादन करण्यात येत आहे.

हा कार्यक्रम गावातील शिक्षणाच्या प्रगतीचा एक नवा अध्याय ठरला असून, येत्या काळात अंजनटोला शाळा विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणखी प्रेरणादायी उपक्रम राबवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!