September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

कुरखेडा येथे त्रिभुवन बाळबुद्धे यांचे अमरण उपोषण आठव्या दिवशीही सुरू; प्रशासनाची तारांबळ

गडचिरोली/कुरखेडा , 8 जुलै : कुरखेडा तालुक्यातील अंगारा येथील रहिवासी त्रिभुवन तुकाराम बाळबुद्धे यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर 30 जून 2025 पासून सुरू असलेले अमरण उपोषण आज आठव्या दिवशीही कायम आहे. तीन दिवसांपूर्वी 5 जुलै 2025 प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, बाळबुद्धे यांनी प्रशासनावर बळजबरीने रुग्णालयात आणल्याचा आणि उपोषण स्थळावरील साहित्याची अफरातफर करून लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

बाळबुद्धे यांची टोकाची भूमिका
बाळबुद्धे यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही आणि दि. 17/11/2015 चे बेकायदेशीर फेरफार दुरुस्त केले जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाहीत. त्यांच्या या टोकाच्या भूमिकेमुळे तालुका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

प्रशासनाचे पत्र आणि आवाहन
तहसीलदार, कुरखेडा यांनी यापूर्वी दोन पत्रे जारी करून बाळबुद्धे यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. दुसऱ्या पत्रात मौजा अंगारा येथील सर्वे क्र. 7, 8, 75, 77, 83, 78 आणि 79 मधील फेरफार क्र. 303, 304 आणि 305 अन्वये ममता धरम बाळबुद्धे, दिगंबर तुकाराम बाळबुद्धे आणि त्रिभुवन बाळबुद्धे यांना अनुक्रमे क्षेत्र मंजूर झाल्याचे नमूद आहे. तहसीलदारांनी मध्स्थण अधिकारी किंवा दिवाणी न्यायालयाचे आदेश उपलब्ध करून दिल्यास पुढील कार्यवाही शक्य होईल, असे सांगितले आहे. तसेच, मा. जिल्हा न्यायाधीश, गडचिरोली यांच्या दि. 28/06/2017 च्या आदेशानुसार प्रकरण प्रथम न्यायालयात पुनर्विचारासाठी पाठवण्यात आल्याचे स्पष्ट करून कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्याची सूचना केली आहे.

बाळबुद्धे यांचे आरोप:
बाळबुद्धे यांनी प्रशासनावर संगनमताने चुकीची कार्यवाही केल्याचा आरोप केला आहे. मृत्युपत्रातील सर्वे क्र. 5 आणि 6 दडवून ठेवण्यात आले असून, दि. 09/10/2015 रोजी खारीज झालेल्या निर्णयाकडे दुर्लक्ष झाले. दि. 24/12/2024 रोजी उपविभागीय कार्यालयात दाखल अपीलवर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने त्यांनी उपोषण सुरू केले. त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
1. दि. 17/11/2015 चे फेरफार रद्द करावे.
2. खोटे अर्ज सादर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
3. खरीप हंगाम 2025 साठी तात्काळ नवीन फेरफार घेऊन मालमत्तेचा ताबा द्यावा.
4. पोलीस पाटील यांनी उर्वरित साहित्याची माहिती द्यावी.
5. मृत्युपत्रातील मालमत्तेची हिस्सेवाटणी करावी.
6. फसवणूक आणि मानहानीबद्दल ₹1,00,000/- नुकसान भरपाई द्यावी.
7. वारसा हक्कानुसार फेरफार घेऊन लेखी हमी द्यावी.
8. दि. 24/12/2024 च्या अपीलवर तात्काळ निर्णय घ्यावा.
9. श्री. व्यंकट विठोबा येरणे यांच्याशी झालेल्या जागेच्या व्यवहाराची रक्कम मिळवून द्यावी.
10. तंटामुक्ती समितीने तात्काळ सभा घेऊन हिस्सेवाटणीचा निर्णय द्यावा.

स्थानिक प्रतिक्रिया आणि प्रशासनाची अडचण:
बाळबुद्धे यांच्या उपोषणामुळे कुरखेडा परिसरात प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे. बाळबुद्धे यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केल्याचा आणि उपोषण स्थळावरील साहित्याची अफरातफर केल्याचा आरोप यामुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे. स्थानिकांनी प्रशासनाने तात्काळ चौकशी करून मागण्यांचे निराकरण करावे, अशी मागणी केली आहे.

बाळबुद्धे यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याची भूमिका घेतली आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!