चिखली येथील चिचटोला फाटा यात्री निवारा मागणीसाठी आम आदमी पार्टीचे निवेदन

कुरखेडा, 8 जुलै : चिखली ग्रामपंचायत अंतर्गत कुरखेडा-वडसा मुख्य मार्गावरील चिचटोला फाटा येथे बस थांब्याजवळ यात्री निवारा उभारण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टी, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आज उपविभागीय कार्यालय, कुरखेडा येथे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन जिल्हाध्यक्ष नसीर हाशमी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांच्याकडे सुपूर्द केले.

चिचटोला फाटा हा एक वर्दळीचा परिसर असून, येथे दररोज मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील प्रवासी बसची प्रतीक्षा करतात. यात्री निवारा नसल्याने प्रवाशांना, विशेषतः महिला, वृद्ध आणि लहान मुलांना उन्ह, पाऊस आणि थंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच, आसन व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचा अभाव यामुळे प्रवाशांचे हाल होतात. या निवेदनात मजबूत छत, आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, रात्रीच्या प्रकाशाची व्यवस्था आणि सुरक्षित बांधकाम यासारख्या सुविधांसह यात्री निवारा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

नसीर हाशमी यांनी सांगितले की, “हा यात्री निवारा उभारल्यास ग्रामीण भागातील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल. आम आदमी पार्टी नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी कटिबद्ध आहे.” निवेदनासोबत चिखली ग्रामपंचायत सदस्य रामसाय मडावी, संघटक अतुल सिंदराम, कार्यकर्ते महेंद्र मडावी, सतीश सिंदराम, रोशन नैताम, विजय मडावी, सचिन ओटी आणि विकास मडावी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांनी निवेदन स्वीकारून या मागणीवर तात्काळ कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटला असून, लवकरच यात्री निवारा उभारला जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!