March 7, 2026

मरकणारमध्ये स्वातंत्र्याची नवी पहाट: प्रथमच एसटी बसचे आगमन

गडचिरोली, १७ जुलै : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम मरकणार गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच एसटी बस पोहोचल्याने स्थानिक नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. गडचिरोली पोलीस दल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संयुक्त प्रयत्नांतून मरकणार ते अहेरी बस सेवेला सुरुवात झाली. भामरागड उपविभागातील अबुझमाडच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात राष्ट्रध्वज फडकावत गावकऱ्यांनी बसचे उत्साहात स्वागत केले.

मरकणारचे गाव पाटील झुरु मालु मट्टामी यांनी बस सेवेचे उद्घाटन केले. यावेळी सीआरपीएफ ३७ बटालियनचे असिस्टंट कमांडंट अविनाश चौधरी आणि कोठीचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक दिलीप गवळी यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. पोलीस दलाने मिठाई वाटप करत आनंद व्यक्त केला. या बस सेवेमुळे मरकणार, मुरुमभुशी, फुलणार, कोपर्शी, पोयारकोठी आणि गुंडूरवाही येथील १२०० हून अधिक नागरिकांना, विशेषतः रुग्ण, विद्यार्थी आणि प्रवाशांना वर्षभर सहज प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे. यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होईल.

नक्षल गावबंदी आणि विकासाचे पाऊल: गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांमुळे ९ फेब्रुवारी २०२५ रोजी मरकणार गावकऱ्यांनी नक्षल्यांना गावबंदीचा ठराव मंजूर केला होता. गतवर्षी पोलीस संरक्षणात कोठी ते मरकणार रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले, तर मरकणार ते मुरुमभुशी रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. गावात एअरटेल टॉवर उभारण्यात आले असून, यापूर्वी प्रवास सुविधांचा अभाव असलेल्या या भागातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

पोलीस संरक्षणात पायाभूत सुविधांचा विकास: गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात प्रवास सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी गडचिरोली पोलीस दलाने गेल्या पाच वर्षांत ४२० किमी रस्ते आणि ६० पूल बांधकाम पूर्ण केले. यंदा १ जानेवारी २०२५ रोजी गट्टा-गर्दैवाडा-वांगेतुरी आणि २७ एप्रिल २०२५ रोजी कटेझरी ते गडचिरोली बस सेवा सुरू झाल्या. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला असून, अतिदुर्गम भागातील नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी पोलीस दलाचे प्रयत्न सुरू आहेत.

या बस सेवेच्या माध्यमातून मरकणारसह आसपासच्या गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!