“गडचिरोली: 29 जुलैला जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्रुटी पूर्तता विशेष शिबिर”
गडचिरोली, 25 जुलै : शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या, परंतु अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोलीमार्फत 29 जुलै 2025 रोजी विशेष त्रुटी पूर्तता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा करणे आहे.
अनु.जाती (SC), इमाव (OBC), एसईबीसी (SEBC) आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी ऑनलाइन अर्जाद्वारे समितीकडे प्रस्ताव सादर केले होते. समितीने 17 जुलै 2025 पर्यंत बहुतांश प्रकरणांचा निकाल जाहीर केला असला, तरी काही प्रकरणांमध्ये कागदपत्रांतील त्रुटींमुळे प्रमाणपत्र जारी करणे शक्य झाले नाही.
या पार्श्वभूमीवर, 29 जुलै 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय. चौक, एल.आय.सी. रस्ता, गडचिरोली येथे विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतींसह उपस्थित राहून त्रुटी पूर्ण कराव्यात. त्रुटी अभावी प्रकरण प्रलंबित राहिल्यास किंवा प्रवेश रद्द झाल्यास संपूर्ण जबाबदारी अर्जदाराची राहील. सर्व संबंधितांनी विहित दिवशी कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.
