October 22, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

पीक विमा आणि PMFME: गडचिरोलीत शेतकऱ्यांसाठी लपलेली संधी उघड होणार?

“गडचिरोलीत शेतकऱ्यांसाठी मोठी संधी: पीक विमा आणि सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश”

गडचिरोली, २५ जुलै :  शेतकऱ्यांना संकटकाळात आधार देणाऱ्या सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ३१ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पीक विमा योजना आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी खोमणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत ढोंगले, कृषी उपसंचालक मधुगंधा जुलमे, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक किशोर झाडे यांच्यासह बँक, विमा कंपनी आणि आत्माचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पीक विमा योजनेला गती देण्याचे निर्देश
खरीप हंगाम २०२५ साठी पीक विमा योजनेत अर्ज नोंदणी अपेक्षित संख्येपेक्षा कमी असल्याचे आढाव्यात दिसून आले. यामुळे जिल्हाधिकारी पंडा यांनी एकही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहू नये यासाठी ग्रामस्तरावरील अधिकारी, कर्मचारी आणि बँक प्रतिनिधींना जनजागृती, मदत केंद्रांची स्थापना आणि अर्ज प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले. यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमध्ये आर्थिक संरक्षण मिळण्यास मदत होईल.

PMFME योजनेत अडथळ्यांवर नाराजी
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नती योजनेत बँक प्रक्रियेतील विलंबामुळे अंमलबजावणी संथगतीने होत असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी पंडा यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी बँक शाखा प्रमुखांना प्रलंबित प्रस्ताव त्वरित निकाली काढण्याचे आदेश दिले. ही योजना ग्रामीण भागातील नवउद्योजक, महिला बचत गट आणि तरुणांना शेतीआधारित लघुउद्योगांसाठी अनुदानाद्वारे आर्थिक बळकटी देणारी आहे. योजनेची जनजागृती वाढवण्यासाठी आणि अर्ज प्रक्रियेत शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी पंडा यांनी या दोन्ही योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांना समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले, जेणेकरून गडचिरोलीतील शेतकरी आणि उद्योजकांना याचा जास्तीत जास्त लाभ मिळेल.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!