September 8, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

नागेपल्लीत महसूल शिबिर: जिल्हाधिकाऱ्यांची भेट, दाखले वितरण अन् समस्यांचे निराकरण

आनंद दहागावकर, गडचिरोली/अहेरी, २८ जुलै : तालुक्यातील नागेपल्ली येथे महसूल विभागातर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय आसवले, उपविभागीय अधिकारी कुशल जैन, तहसीलदार बालाजी सोमवंशी, गटविकास अधिकारी गणेश चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पांडा यांनी अहेरी तालुका दौऱ्यादरम्यान प्रकल्प कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेतला आणि अहेरी-देवलमरी रस्त्याची पाहणी केली. त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अहेरी नगरपंचायतीला भेट देताना महसूल विभागाच्या इमारतीच्या कामकाजाची माहिती मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपणही झाले. तसेच, नागेपल्लीकडे जाताना त्यांनी महिला व बाल रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी केली.

नागेपल्ली ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी वन, आरोग्य, शिक्षण, कृषी विभाग आणि बचत गटांच्या महिलांशी संवाद साधला. अहेरी तहसील कार्यालयामार्फत आयोजित शिबिरात त्यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वितरण झाले. नागरिक आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्यांचे निवेदन स्वीकारून लवकरच निराकरणाचे आश्वासन त्यांनी दिले.

जिल्हा परिषद शाळेची पाहणी
जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी करून शैक्षणिक उपक्रम आणि शिक्षकांच्या उपस्थितीची माहिती घेतली. गटविकास अधिकारी गणेश चव्हाण, गटशिक्षण अधिकारी सुनील आईंचवार आणि केंद्रप्रमुख विनायक पुरकलवार यांनी शाळेची माहिती दिली. यावेळी स्वयंपाक गृहाची पाहणी आणि शालेय परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!