नागरिकांच्या आरोग्यासाठी आम आदमी पार्टी मैदानात; डासांविरुद्ध फवारणीची मागणी

“देसाईगंजात डासांच्या प्रादुर्भावाविरोधात आम आदमी पार्टीचे नगर परिषदेला निवेदन”

देसाईगंज, २९ जुलै : देसाईगंज परिसरात वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू आणि मलेरियासारख्या घातक आजारांचा धोका वाढला आहे. याविरोधात आम आदमी पार्टी, देसाईगंज शहर शाखेने पुढाकार घेत नगर परिषद प्रशासनाला तात्काळ फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष आशिष दादाजी घुटके यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर महासचिव दीपक नागदेवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी शहर महिला आघाडी अध्यक्ष शिल्पा बोरकर, शहर संघटन मंत्री वामन पगाडे आणि सदस्य आशिष कोवे यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात, डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका अधोरेखित करण्यात आला आहे. डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांमुळे अनेक कुटुंबे संकटात सापडली असून, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण नगर परिषद क्षेत्रात प्रभावी फवारणी, नाले-गटारांची नियमित स्वच्छता, जनजागृती मोहीम आणि वैद्यकीय सुविधांचा विस्तार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आशिष घुटके यांनी यावेळी सांगितले, “नागरिकांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. नगर परिषद प्रशासनाने तात्काळ कार्यवाही न केल्यास आम आदमी पार्टी अधिक तीव्र आंदोलन छेडेल.” दीपक नागदेवे यांनीही प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले.

या निवेदनामुळे स्थानिक प्रशासनावर दबाव वाढला असून, नागरिकांमध्येही या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. आम आदमी पार्टीने प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून, येत्या काही दिवसांत प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!