“शिक्षणाने स्वप्न साकार करा, आदिवासी संस्कृती जपा : डॉ. अशोक उईके यांचा गडचिरोलीतील प्रेरणादायी संदेश”
गडचिरोली, ३० जुलै : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज गडचिरोलीतील सेमाना रोड येथील शासकीय इंग्रजी माध्यम आदिवासी आश्रमशाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत आदिवासी संस्कृतीचे जतन करताना उच्च शिक्षण घेऊन देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. “खूप शिका, मंत्री व्हा, कलेक्टर व्हा,” असे प्रेरणादायी शब्द त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून उच्चारले.
मंत्र्यांनी शाळेच्या आवारात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना निसर्गाची काळजी घेण्याचा संदेश दिला. त्यांनी मुलींच्या वसतिगृहाची पाहणी करून निवास, भोजन आणि इतर सुविधांची तपासणी केली. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी महापुरुषांचे फोटो, आचारसंहितेचे फलक लावणे आणि अभ्यागतांसाठी बसण्याची व्यवस्था सुधारण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी दिल्या.
या प्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी अपर आयुक्त आयुषी सिंह, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव, तसेच अशोक नेते, डॉ. देवराव होळी, नामदेव उसेंडी, प्रकाश गेडाम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
