October 22, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

हेडरीत इतिहास रचला: ४.६३ किलो बाळाचा सिझेरियनविना जन्म!

अहेरी, गडचिरोली, ३० जुलै : एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल (एलकेएएम) रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात एक नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. २७ जुलै २०२५ रोजी येथे ४.६३ किलो वजनाच्या बाळाची सामान्य आणि सुरक्षित प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली. मधुमेह नसलेल्या मुलचेरा येथील सुंदर नगरच्या रहिवासी आईने सिझेरियन किंवा एपिसिओटॉमीशिवाय या जास्त वजनाच्या बाळाला जन्म दिला, जी गडचिरोली परिसरातील दुर्मीळ घटनांपैकी एक मानली जात आहे.

प्रसूतीदरम्यान ‘शोल्डर डिस्टोसिया’ सारख्या गुंतागुंतीला तोंड द्यावे लागले, ज्यामध्ये बाळाचा खांदा आईच्या पेल्विसमध्ये अडकतो. मात्र, रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने अखंड टीमवर्क आणि क्लिनिकल कौशल्याने ही आव्हाने यशस्वीपणे पार केली. यामुळे आई आणि बाळ दोघेही निरोगी राहिले.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांनी रुग्णालयाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल टीमचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “ही घटना आमच्या दर्जेदार आरोग्यसेवेच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.” तसेच, लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या संचालिका कीर्ती रेड्डी यांनी वैद्यकीय पथकाला सतत मार्गदर्शन आणि पाठिंबा दिल्याबद्दल रुग्णालयाने त्यांचे आभार मानले.

ही यशोगाथा एलकेएएम रुग्णालयाच्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवेची आणि गुंतागुंतीच्या प्रसूती हाताळण्यातील त्यांच्या निपुणतेची साक्ष देते. गडचिरोलीसारख्या ग्रामीण भागात अशा उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!