रोपवन शेतकरी कंपनीला श्रीमती हिरळकर यांच्या मार्गदर्शनाची ऊर्जा: कुरखेड्यात नैसर्गिक शेतीची झेप
कुरखेडा, ३१ जुलै : गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा घाटी येथील रोपवन शेतकरी उत्पादक कंपनी नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आत्माच्या सहकार्याने कार्यरत असलेल्या या कंपनीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीने नवे बळ आणि प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने कंपनी शाश्वत शेती आणि रोजगार निर्मितीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
श्रीमती हिरळकर यांनी प्रकल्पाची सखोल पाहणी करून शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या या भेटीने कंपनीच्या कार्याला गती मिळाली असून, शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या प्रेरणेने जैविक निविष्ठा संसाधन केंद्र (BIRC) आणि शेत बांधावरील प्रयोगशाळेची निर्मिती वेगाने सुरू आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा आणि माती-पाणी तपासणीच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
रोपवन शेतकरी उत्पादक कंपनीने अवघ्या आठ ते दहा महिन्यांत 50 हेक्टर क्षेत्रात 20 शेतकरी गट स्थापन करून 800 शेतकऱ्यांना जोडले आहे. बायोडायनॅमिक कंपोस्ट आणि तरल खत निर्मितीसह 15 एकरवर हळद आणि 50 एकरवर यांत्रिक भात लागवड यासारखे यशस्वी प्रयोग कंपनीने राबवले आहेत. जिल्हा खनिज निधीमार्फत जैविक निविष्ठा किट, मोहफूल संकलन केंद्र आणि मधुमक्षिका पालनासाठी मिळालेल्या लाभाने शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
कंपनीचे संचालक श्री. रमेश पिलारे यांनी श्रीमती हिरळकर यांच्या भेटीचे कौतुक करताना सांगितले, “त्यांच्या मार्गदर्शनाने आमच्या उपक्रमांना नवी दिशा मिळाली आहे. कृषी विभाग आणि आत्माच्या सहकार्याने सेंद्रिय निविष्ठा, मोहफूल संकलन आणि मधुमक्षिका पालनासारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना रोजगार मिळाला आहे. श्रीमती हिरळकर यांच्या पाठबळाने आमची कंपनी भविष्यात प्रगतीचा नवा टप्पा गाठेल.”
या भेटीप्रसंगी श्री. आनंद कांबळे, श्री. महेश परांजपे, श्री. संजय रामटेके, श्री. योगेश बोरकर, कुमारी सोनी वडे, कुमारी सपना कन्नाके, कुमारी प्रियंका दडमल, श्री. आशीष बन्सोड आणि कंपनीचे संचालक श्री. रमेश पिलारे, श्री. रेवनाथ नाकाडे, श्री. लोकेश बावणे उपस्थित होते.
श्रीमती हिरळकर यांच्या या भेटीने रोपवन शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्याला नवसंजननी मिळाली असून, कुरखेड्यातील शेतकरी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून समृद्धी आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर आत्मविश्वासाने वाटचाल करत आहेत.
