September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

नवेझरी प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या गैरहजेरीचा मुद्दा आम आदमी पक्षाच्या शाळा भेटी अभियानात उघड; नसिर हाशमी यांच्यासह ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

कुरखेडा, गडचिरोली (५ ऑगस्ट ): मौजा नवेझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री. आर. व्ही. उसेंडी यांच्या सातत्यपूर्ण अनधिकृत गैरहजेरीचा गंभीर मुद्दा आम आदमी पक्षाच्या (आप) शाळा भेटी अभियानादरम्यान उजेडात आला. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नसिर हाशमी यांनी याबाबत ग्रामस्थ, पालक आणि सरपंच दिगंबर कोकोडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यानंतर त्यांनी शिक्षण विभागाला पत्र लिहून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे आणि आवश्यकता पडल्यास आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला आहे.

नवेझरी येथील शाळेत २९ विद्यार्थी शिक्षण घेत असून, दोन शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, श्री. उसेंडी हे जानेवारी २०२४ पासून वारंवार अनधिकृतपणे गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यापूर्वी सरपंच दिगंबर कोकोडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कालिदास गेडाम आणि पालक राकेश पदा यांनी गटशिक्षण अधिकारी श्री. शिवणकर यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनात शिक्षकावर कारवाई, त्यांची बदली आणि नवीन शिक्षकाची नियुक्ती याची मागणी करण्यात आली होती.

आम आदमी पक्षाच्या शाळा भेटी अभियानादरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर नसिर हाशमी यांनी स्थानिक पालक आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांनी शिक्षण विभागाला पत्र लिहून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आणि त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलनाची चेतावणी दिली. “आम आदमी पक्ष शिक्षणाच्या हक्कासाठी कटिबद्ध आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आम्ही सरकारी शाळांचे दर्जेदार मॉडेल उभे केले आहे. गडचिरोलीतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येणार नाही, यासाठी आम्ही लढा देऊ,” असे हाशमी यांनी सांगितले.

या प्रकरणात गटशिक्षण अधिकारी श्री. शिवणकर यांनी निवेदन स्वीकारले असून, लवकरच योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे. मात्र, जोपर्यंत ठोस पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत आम आदमी पक्ष, ग्रामस्थ आणि पालकांचा आंदोलनाचा इशारा कायम आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!