April 23, 2026

गडचिरोलीत शिक्षण संकट: AAP ने शिक्षणमंत्र्यांना सादर केले निवेदन

गडचिरोली, 8 ऑगस्ट : जिल्ह्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीने (AAP) आज सर्किट हाऊस येथे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन सादर केले. या प्रसंगी AAP चे जिल्हा अध्यक्ष नसिर हाशमी, जिल्हा सचिव अमृत मेहेर, जिल्हा संघटक ताहिर शेख, संघटन मंत्री चेतन गहाणे आणि उमेश भांडेकर, शहर संघटक साहिल बोदेले, युवा संघटक इरफान पठाण आणि संतोष कोडापे यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटी शिक्षक उपस्थित होते. या सर्वांनी शिक्षणातील समस्यांना वाचा फोडली.

जिल्हाभरातील शाळांना भेटी देऊन AAP ने केलेल्या पाहणीत शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न, कंत्राटी शिक्षकांना वेळेवर मानधन न मिळणे, शौचालयांची दुरवस्था आणि शाळांच्या जीर्ण इमारतींच्या समस्या समोर आल्या. 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये दोन शिक्षक असताना, 30 पेक्षा जास्त पटसंख्येच्या शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक आहे. शिक्षकांच्या बदली प्रक्रिया फेब्रुवारीपासून रखडली असून, भरती प्रक्रिया ठप्प आहे. यामुळे शाळा सुरू होऊन 50 दिवस उलटले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबलेले नाही.

कंत्राटी शिक्षकांवर अवलंबून असलेल्या शाळांमध्ये मानधनाची अनियमितता त्यांचे मनोबल खचवत आहे. तसेच, अस्वच्छ शौचालये आणि जीर्ण इमारतींमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.

AAP ने निवेदनात मागणी केली आहे की, शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, कंत्राटी शिक्षकांना वेळेवर मानधन द्यावे आणि शाळांच्या पायाभूत सुविधांची दुरुस्ती त्वरित करावी. पक्षाने शिक्षण विभागाला चेतावणी दिली की, या समस्यांचे तात्काळ निराकरण न झाल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येईल.

शिक्षणमंत्री भुसे यांनी निवेदन स्वीकारताना या समस्यांवर लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. नसिर हाशमी यांच्या नेतृत्वाखाली AAP च्या पदाधिकाऱ्यांनी आणि कंत्राटी शिक्षकांनी या लढ्याला पाठिंबा देत शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

“शिक्षकांशिवाय शिक्षण अपूर्ण, रिक्त पदे भरा, शाळांना आधार द्या!” असे स्लोगन देत AAP ने जिल्ह्यातील शैक्षणिक सुधारणांसाठी आपला लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!