कमलापूरात हत्ती दिन उत्साहात: विद्यार्थी, पर्यटकांचा उत्स्फूर्त सहभाग
“कमलापूर हत्तीकॅम्पमध्ये जागतिक हत्ती दिन उत्साहात साजरा”
आनंद दहागावकर, अहेरी (गडचिरोली), १३ ऑगस्ट : गडचिरोली वनवृत्तातील सिरोंचा वनविभागांतर्गत कमलापूर येथील राज्यातील एकमेव शासकीय हत्तीकॅम्पमध्ये जागतिक हत्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावर्षी सूरजागड लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि. यांच्या लॉयड्स राज विद्यानिकेतन कॉन्व्हेंट हेडरी शाळेतील विद्यार्थी, वन्यजीवप्रेमी आणि पर्यटकांनी हत्तीकॅम्प परिसरात मोठी गर्दी केली.
कमलापूर हत्तीकॅम्पमध्ये मंगला, बसंती, राणी, प्रियंका, रूपा, लक्ष्मी, कुसुम या सात मादी आणि अजित, गणेश या दोन नर अशा एकूण नऊ हत्तींची देखभाल केली जाते. जागतिक हत्ती दिनानिमित्त १२ ऑगस्ट रोजी कमलापूर वनपरिक्षेत्र कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परिसर सजावटीने सजवून पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी हत्तींसोबत संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना हत्तींच्या सवयी, राहणीमान आणि संवर्धनाबाबत माहिती देत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले.
विशेष म्हणजे, तज्ञ पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हत्तींची आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाला सिरोंचाचे उपविभागीय वनाधिकारी विष्णुवर्धन रेड्डी (भावसे), गोरेवाडा वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे तज्ञ डॉ. सुजित कोलंगथ, कमलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरेश गडमडे आणि पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज दोनाडकर उपस्थित होते.
हत्ती दिनाच्या निमित्ताने पर्यटक आणि विद्यार्थ्यांमध्ये हत्ती संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली. कमलापूर हत्तीकॅम्पने वन्यजीव संरक्षणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.
