वडसा शहरात जनशक्ती युवा संघटनेच्या पुढाकाराने प्रथमच भव्य मारबत उत्सव : ढोल-ताशांच्या गजरात ऐतिहासिक सोहळा
वडसा, २४ ऑगस्ट : वडसा शहराने आज एका सांस्कृतिक उत्सवाच्या माध्यमातून इतिहास रचला. जनशक्ती युवा संघटनेच्या पुढाकाराने प्रथमच आयोजित भव्य मारबत उत्सवाने शहराला उत्साह आणि अभिमानाने भरून टाकले. ढोल-ताशांच्या गजरात आणि झांजपथकांच्या नादावर थिरकणाऱ्या हजारो नागरिकांनी हा सोहळा अविस्मरणीय बनवला.
सकाळपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण होते. दुपारी प्रमुख मार्गांवर निघालेल्या रॅलीने तरुण, महिला आणि मुलांसह सर्व वयोगटातील नागरिकांना एकत्र आणले. पारंपरिक वेशभूषा, महाकाल, काली माता, कालभैरव, टेडी बेअर यांसारखे आकर्षक रथ आणि कलाकारांचे देखावे या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले.
जनशक्ती युवा संघटनेचा नवा सांस्कृतिक आयाम
जनशक्ती युवा संघटनेने अल्पावधीतच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. या उत्सवाच्या यशस्वी आयोजनाने वडसा शहराला एक नवा सांस्कृतिक वारसा मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हा उत्सव खऱ्या अर्थाने लोकउत्सवात परिवर्तित केला.
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
या भव्य सोहळ्याचे उद्घाटन आमदार श्री. रामदासजी मसाराम, माजी आमदार कृष्णभाऊ गजबे, सौ. माधुरीताई मडावी, ज्येष्ठ नागरिक परसरामजी टिकले, राजेंद्र बुल्ले, नरेंद्र गजपुरे यांच्या हस्ते पूजनाने झाले. जनशक्ती युवा संघटनेचे अध्यक्ष पिंकूभाऊ बावणे, उपाध्यक्ष नितीनभाऊ घुले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिस्त आणि एकतेचा आदर्श
रॅली शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडली, ज्याचे प्रशासन आणि नागरिकांनी विशेष कौतुक केले. उत्साह, शांतता आणि शिस्त यांचे सुंदर मिश्रण घडवून जनशक्ती युवा संघटनेने एकतेचा आदर्श प्रस्थापित केला.
नागरिकांचा वाढता विश्वास
विविध सामाजिक उपक्रमांद्वारे जनशक्ती युवा संघटनेने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. या उत्सवातील उस्फूर्त सहभागातून हा विश्वास स्पष्टपणे दिसून आला.
सांस्कृतिक वारसाचा नवा अध्याय
या भव्य आयोजनाने वडसा शहराने आपली सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक ऐक्य नव्या उंचीवर नेले. पहिल्याच वर्षी यशस्वी झालेल्या या उत्सवाने भविष्यातील भव्य सांस्कृतिक पर्वाची नांदी दिली आहे.
