March 7, 2026

कुरखेडा येथे सलग दुसऱ्या अजगराचे आगमन: शेतकऱ्यांमध्ये भीती, वनविभागाने केले यशस्वी रेस्क्यू

कुरखेडा, २५ ऑगस्ट : कुरखेडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अजगर सापांच्या आढळण्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात शहेजाद हाशमी यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये कोंबडी खाणाऱ्या अजगराला वनविभागाने रेस्क्यू करून जंगलात सोडले होते. आता पुन्हा याच परिसरात शेतकरी राहुल गिरडकर यांच्या शेतात 6 ते 7 फूट लांबीचा आणि 10 ते 12 किलो वजनाचा दुसरा अजगर आढळल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे.

या अजगराची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने कारवाई केली. वनपरिक्षेत्र अधिकारी कुरखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. एस. एल. कंकलवार (क्षेत्र सहाय्यक), एस. डब्ल्यू. गोन्नाडे (वनरक्षक), मुकेश सय्याम (वनरक्षक), काशीवर (वनरक्षक), विक्की गोबाडे (वनमजूर), तोशिप, रोशन मेश्राम, शहेजाद हाशमी आणि इम्रान पठाण यांच्या चमूने अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने या अजगराचे रेस्क्यू केले. हा अजगर कक्ष क्रमांक 150 मधील जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आला. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान स्थानिकांनीही वनविभागाच्या चमूला सहकार्य केले.

कुरखेडा परिसरात सलग दुसऱ्या अजगराच्या आढळ्याने शेतकरी आणि स्थानिक रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शेतात काम करताना किंवा पोल्ट्री फार्म्समध्ये साप आढळण्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे आणि पशुधनाचे रक्षण कसे करावे, याची चिंता सतावत आहे. स्थानिक शेतकरी आता वनविभागाकडून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना आणि सतर्कतेच्या दृष्टीने मार्गदर्शनाची अपेक्षा करत आहेत.

वनविभागाने स्थानिकांना सावध राहण्याचे आणि शेतात किंवा परिसरात अजगर किंवा इतर वन्यप्राणी आढळल्यास तातडीने वनविभागाला कळवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अशा प्राण्यांना हानी न पोहोचवता त्यांचे संरक्षण आणि सुरक्षित रेस्क्यू करण्याचे वनविभागाचे धोरण असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे वनविभागाच्या तत्परतेचे कौतुक होत असले, तरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती कायम आहे. वनविभागाने यापुढेही सतर्क राहून अशा घटनांना त्वरित प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!