March 7, 2026

विदर्भ महसूल सेवक संघटनेकडून चतुर्थ श्रेणी दर्जासाठी बेमुदत आंदोलनाची घोषणा

नागपूर, ३ सप्टेंबर :  विदर्भ महसूल सेवक संघटना (रजि.नं. महाराष्ट्र १९९/९० नागपूर) ने महसूल सेवक (कोतवाल) पदाला शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा मिळावा, या मागणीसाठी आंदोलनाची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना उद्देशून पाठवलेल्या पत्रात संघटनेने ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास १२ सप्टेंबरपासून कोराडी (नागपूर) येथील किडा संकुलात बेमुदत धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

महसूल सेवक (कोतवाल) हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल यंत्रणेचा महत्त्वाचा घटक मानले जातात. शासकीय योजनांची गावपातळीवरील अंमलबजावणी, निवडणुका, जनगणना, आपत्ती व्यवस्थापन, विविध प्रमाणपत्रांचे वितरण आणि बिगर-महसुली कामे कोतवाल २४ तास कार्यरत राहून पार पाडतात. तरीही, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा-सुविधा आणि चतुर्थ श्रेणी दर्जा मिळालेला नाही. यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. “महसूल सेवक हा शासन आणि जनता यांच्यातील दुवा आहे. आमच्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन चतुर्थ श्रेणी दर्जा देणे गरजेचे आहे,” असे संघटनेचे अध्यक्ष रविंद्र बोदेले (7798344547) यांनी सांगितले.

संघटनेने आंदोलनाचा टप्पेनिहाय कार्यक्रम जाहीर केला आहे. १० सप्टेंबर २०२५ रोजी सर्व महसूल सेवक काळ्या फिती लावून काम करतील. ११ सप्टेंबर रोजी तालुका स्तरावर एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन होईल. मागणी पूर्ण न झाल्यास १२ सप्टेंबरपासून कोराडी येथे बेमुदत कामबंद आणि साखळी उपोषण सुरू होईल. कार्याध्यक्ष मंगेश जांभुळकर (7030522142) म्हणाले, “आम्ही शासनाला मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे. आता आम्ही निर्णायक लढा देऊ.”

संघटनेचे उपाध्यक्ष शुभम जोगवे (9511841405), स्वराज जिलठे (7875721134), सरचिटणीस दिपक रेवतकर (9158207658) आणि महिला अध्यक्ष वैशालीताई कोल्हे (9112138600) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलढाणा येथील जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष या आंदोलनात सहभागी होणार आहेत. प्रसिद्धी प्रमुख विक्की देशमुख (अकोला) आणि उल्हास क्षिरसागर (भंडारा) यांनी सर्व महसूल सेवकांना एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

संघटनेने शासनाला लवकरात लवकर चतुर्थ श्रेणी दर्जा लागू करून महसूल सेवकांचा अन्याय दूर करण्याची विनंती केली आहे. पत्राची प्रत मुख्यमंत्री, महसूल व वनविभाग सचिव, विभागीय आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना पाठवण्यात आली आहे. विदर्भ समन्वयक घनशाम पटले, गोपाल ठवरे आणि योगेश शेडमाके यांनीही शासनाला मागणी मान्य करण्याचे आवाहन केले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!