एम-सॅन्डचा वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा: जिल्हाधिकाऱ्यांचे बांधकाम क्षेत्राला आवाहन
गडचिरोली, ०४ सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत नागरीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग आला आहे. प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट गाव मिशन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि सिंचन प्रकल्पांसारख्या योजनांमुळे बांधकाम क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. या वाढत्या बांधकामांमुळे नदीपात्रातील दर्जेदार वाळूची मागणी वाढली आहे. मात्र, नद्यांचा पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि टिकाऊ विकासाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांना कृत्रिम वाळू (एम-सॅन्ड) चा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे. एम-सॅन्ड हा स्वस्त, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक पर्याय असून, तो बांधकाम क्षेत्रासाठी वरदान ठरू शकतो.
महसूल विभागाने २३ मे २०२५ च्या शासन निर्णय आणि १७ जुलै २०२५ च्या परिपत्रकाद्वारे कृत्रिम वाळू धोरण निश्चित केले आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यपद्धतीही स्पष्ट करण्यात आली आहे. एम-सॅन्डचे अनेक फायदे आहेत. याचे कण नैसर्गिक वाळूपेक्षा अधिक कोनीय आणि खडबडीत असतात, ज्यामुळे ते सिमेंटसोबत उत्तम मिसळतात. गाळ आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी असल्याने काँक्रीटची गुणवत्ता सुधारते आणि बांधकामाची टिकाऊपणा वाढतो. नियंत्रित परिस्थितीत तयार होणाऱ्या एम-सॅन्डच्या कणांचा आकार एकसमान असतो, ज्यामुळे बांधकाम प्रक्रिया सुलभ होते. याशिवाय, एम-सॅन्डमुळे सिमेंट आणि पाण्याचा वापर कमी होतो, ज्यामुळे आर्थिक बचत होते आणि बांधकामाची मजबुती वाढते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एम-सॅन्ड नदीपात्रातील वाळूपेक्षा स्वस्त आहे आणि सहज उपलब्ध आहे, ज्यामुळे बांधकाम खर्च कमी होतो.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, नदीपात्रातील वाळूच्या अनियंत्रित उपशामुळे नद्यांचा पर्यावरणीय समतोल धोक्यात येत आहे. यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह, जलचरांचे अधिवास आणि आसपासच्या पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. एम-सॅन्डचा वापर केल्यास नद्यांचे संरक्षण होईल आणि बांधकाम क्षेत्राला परवडणारा, दर्जेदार पर्याय उपलब्ध होईल. यामुळे पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक फायदे यांचा समतोल साधला जाईल.
एम-सॅन्ड उद्योग सुरू करण्यास इच्छुक व्यक्ती आणि व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली किंवा सर्व तहसील कार्यालयांमध्ये ऑफलाइन अर्ज सादर करावेत. याशिवाय, शासनाच्या www.mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Application > M-sand Concession application > Application for private land (New quarry) / Application for private land (Ongoing quarry) या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रियेत अडचणी आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म शाखेशी संपर्क साधता येईल. तसेच, www.gadchiroli.nic.in या जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आणि बांधकाम व्यावसायिकांना आवाहन केले आहे की, एम-सॅन्डचा वापर करून नद्यांचे संरक्षण आणि टिकाऊ विकासाला हातभार लावावा. “पर्यावरणाचे रक्षण आणि बांधकाम क्षेत्राचा विकास एकत्रितपणे साध्य करणे शक्य आहे,” असे त्यांनी नमूद केले. एम-सॅन्डच्या वापराला प्रोत्साहन देऊन गडचिरोली जिल्हा पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहे.
