March 7, 2026

आश्रमशाळांतील मुलांसाठी गडचिरोलीत ‘गोवर-रुबेला’ लसीकरण मोहीम

गडचिरोली, 11 सप्टेंबर (जिमाका): जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत ‘गोवर-रुबेला’ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या पुढाकाराने राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेद्वारे गोवर आणि रुबेला या विषाणूजन्य रोगांपासून मुलांना संरक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. भारत सरकारने २०२६ पर्यंत हे रोग निर्मूलनाचे ध्येय ठेवले असून, नुकत्याच धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली प्रशासनानेही या मोहिमेला प्राधान्य दिले आहे.

**मोहिमेची उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये**
या मोहिमेचा उद्देश लसीकरणाचे प्रमाण ९५ टक्क्यांहून अधिक वाढवणे, लसीच्या दोन डोसमधील ड्रॉपआउट दर शून्यापर्यंत आणणे आणि ‘Non Measles Non Rubella Discard Rate’ प्रति लाख लोकसंख्येत २ किंवा त्यापेक्षा जास्त साध्य करणे आहे. आरोग्य विभागासह शिक्षण, आदिवासी विकास आणि महिला व बाल विकास विभाग संयुक्तपणे ही मोहीम यशस्वी करणार आहेत. प्रशिक्षित वैद्यकीय चमूद्वारे प्रत्येक आश्रमशाळेत लसीकरण केले जाईल. गोवरमुळे लहान मुलांमध्ये गंभीर गुंतागुंत, तर रुबेलामुळे गर्भवतींमध्ये जन्मजात विकृती (CRS) निर्माण होऊ शकते, यामुळे लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय आहे.

**जिल्हास्तरीय समन्वय**
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय कृती समितीच्या बैठकीत सर्व विभागांना समन्वयाने काम करून मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव, कुशल जैन, रोशनी चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, समाज कल्याण आयुक्त डॉ. सचिन मडावी, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल्ल हुलके, प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांच्यासह सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

ही मोहीम यशस्वी करून गडचिरोलीतील आश्रमशाळांमधील प्रत्येक मुलाला गोवर आणि रुबेलापासून संरक्षण देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!