September 7, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

कुरखेडा श्रीराम विद्यालयाचा घवघवीत यश! १७ वर्षीय मुलींच्या खो-खो संघाने पटकावला प्रथम क्रमांक

कुरखेडा, २१ सप्टेंबर : आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था संचालित श्रीराम विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा युवक संचालनालय पुणे अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय १७ वर्षीय मुलींच्या खो-खो स्पर्धेत आरमोरी संघावर मात करून प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे या गुणवंत खेळाडूंनी नागपूर विभागीय स्तरावर प्रवेश मिळवला असून, आदिवासी बहुल कुरखेडा भागातील विद्यार्थ्यांचे हे यश सर्वत्र कौतुकाचे ठरत आहे.

कुरखेडा सारख्या दुर्गम आदिवासी भागातून विद्यार्थ्यांनी मैदानी क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून विभागीय पातळीवर झेप घेतली, यामुळे या तरुण खेळाडूंचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. शालेय शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात मार्गदर्शन देणारे क्रिडाप्रेमी प्राचार्य नागेश्वर दोषहर फाये यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण सराव करून हे यश मिळवले. प्राचार्य फाये यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना खो-खो खेळाची बारकावे शिकवले गेले, ज्यामुळे त्या स्पर्धेत विजयी झाल्या.

या यशस्वी संघातील गुणवंत विद्यार्थ्यांचे तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवण्याबद्दल शाळा समिती अध्यक्ष वामनराव फाये, संस्था सचिव दोषहरराव फाये, संस्था सहसचिव व प्राचार्य नागेश्वर फाये, माजी सिनेट सदस्य व शाळा समिती सदस्य चांगदेव फाये, क्रीडा अधिकारी बडकेलवार, खो-खो मार्गदर्शक चौधरी सर व बादल सर, शिक्षक विलास मेश्राम, मोहन बोदेले व परवेझ पठाण यांच्या उपस्थितीत श्रीराम विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जोरदार अभिनंदन केले. संस्थेच्या वतीने या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले असून, विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हे यश आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!