सुकन्या समृध्द योजनेसाठी डाक विभागाचे विशेष अभियान
1 min readनागरीकांना योजनेतंर्गत 9 व 10 फेब्रुवारी कालावधीत उघडता येणार खाते
गडचिरोली,(प्रतिनिधी) दि.0५: सुकन्या समृध्दी योजना ही केंद्र शासनाची मुलींसाठीची महत्वांकाक्षी योजना आहे. ही योजना फक्त मुलींसाठी असून केंद्र शासनाची सर्वात कमी गुंतवणूकीची बचत योजना आहे. मुलींच्या लग्नाच्या वेळी किंवा उच्च शिक्षण घेताना या योजनेची गुंतवणूक अतिशय फायदेशीर ठरते. पोस्ट विभागाद्वारे सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडण्याचे अभियान दिनांक 9 व 10 फेब्रुवारी 2023 या कालावधी राबविण्यात येत आहे.
केंद्र आणि राज्य शासनाद्वारे बँका किंवा पोस्ट ऑफीसमार्फत गुंतवणूकीच्या व बचत ठेवीच्या बऱ्याच योजना राबविल्या जातात. त्यापैकी सुकन्या समृध्दी योजना ही मुलींचे लग्न,शिक्षण,आरोग्य तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूकीची बचत योजना आहे. यामध्ये मुलींच्या आई वडिल यांच्याकडून कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ मुलीच्या भविष्यासाठी घेऊ शकतात.
योजनेची वैशिष्टये:- सर्वात कमी 250 रुपये भरुन सुकन्या समृध्दी योजनेचे खाते चालू करता येते, 10 वर्षाखालील मुलीचे खाते,मुलींचे आई-वडील अथवा कायदेशीर पालकाद्वारे उघडता येते. एका मुलीकरीता केवळ एकच खाते स्वीकारल्या जाईल.तर एका कुटूंबात केवळ दोनच खाते स्वीकारल्या जातील. एका वर्षात किमान रुपये 250 किंवा जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत रक्कम भरुन गुंतवणूक सुरु करता येते. खाते उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी ते परिपक्व होते.व मुलींचे वय 18 वर्षे झाल्यानंतर 50 टक्कापर्यंतची जमा असलेली रक्कम खात्यातून काढता येते. या योजनेत व्याजदर आकर्षक असून वर्तमानामध्ये 7.6 टक्के व्याजदर आहे.या खात्याला भारतामध्ये कुठेही ट्रान्सफर करता येते.तसेच रक्कम बँकेतून,पोस्ट ऑफिस व पोस्ट ऑफिसमधून बँकमध्ये ट्रान्सफर करता येते.
योजनेच्या अधिक माहितीसाठी www.indiapost.gov.in या वेबसाईटवर भेट दयावी. तसेच जिल्हयातील नागरिकांनी सुकन्या समृध्दी खाते उघडण्यासाठी आपल्या जवळील पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा. असे आवाहन पोस्ट विभागामार्फत करण्यात येत आहे.