कुरखेडा महामार्गाचा भंगार! निकृष्ट नाली तुटली, धानाचा ट्रक पलटी; प्रशासनाच्या डोळ्यावर ‘कंत्राटदाराची’ पट्टी?
कुरखेडा (गडचिरोली), १० डिसेंबर : कुरखेडा-कोरची महामार्गाच्या निकृष्ट बांधकामाचा भंडाफोड आता थेट रस्त्यावरच होत आहे! गोठणगाव वन तपासणी चौकीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर श्यामसुंदर राइस मिलसमोरील नव्याने बांधलेली नाली अचानक कोसळली आणि धानाने खच्चून भरलेला ट्रक एका बाजूला झुकून रस्त्यावर पलटी झाला. सुदैवाने जीवितहानी टळली, पण त्याच ठिकाणी राइस मिलकडे जाणारा ट्रॅक्टरही नालीतच अडकून खड्ड्यात कोसळला.
या पूर्वी कुरखेडा पंचायत समितीसमोर आणि अन्सारी टायर दुकानासमोरील नाली कोसळली होती. त्यावेळी आमदार रामदास मसराम यांच्या जनता दरबारात नागरिकांनी हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता. मात्र प्रशासनाने कानाडोळा केल्याचा परिणाम आज दोन मोठ्या अपघातांच्या रूपाने समोर आला आहे.
स्थानिक नागरिक संतप्तपणे प्रश्न उपस्थित करीत आहेत –
“एवढ्या मोठ्या प्रमाणात निकृष्ट साहित्य वापरून नाली का बांधली?
कोट्यवधी रुपयांचे हे काम कोणाच्या आशीर्वादाने चालले आहे?
प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यातील संगनमत तरी किती दिवस लपणार?”
सध्या सदर महामार्गावर खड्डेच खड्डे आणि तुटलेल्या नाल्या हे चित्र सर्वदूर दिसत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.
आमदार रामदास मसराम यांनी जनता दरबारात दिलेली आश्वासने आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे आता हा विषय थेट जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांपर्यंत पोहोचणार का? की पुन्हा एकदा “फाइल फिरत राहील आणि नाली कोसळत राहतील” असेच चित्र राहणार?
कुरखेडावासीयांचा संयम आता संपत आला आहे. निकृष्ट बांधकामाचा हा खेळ किती दिवस चालणार? पुढचा अपघात जीव घेणारा ठरला तर जबाबदारी कोण घेणार?
