September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

खळबळजनक बातमी: देव मंडईत खुलेआम कोंबडी सट्टा अन् जुगाराचा डाव; रोज लाखोंची उलाढाल, प्रशासनाचे अर्थपूर्ण मौन अन् युवकांचे भविष्य धोक्यात!

कुरखेडा (गडचिरोली), १० डिसेंबर : झाडीपट्टीच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या कुरखेडा तालुक्यातील ग्रामीण भागातील पारंपरिक “देव मंडई” आता अवैध कोंबड्यांच्या झुंजीवर आधारित सट्टेबाजी आणि जुगाराचे अड्डा बनली आहे. धार्मिक उत्सवाच्या नावाखाली खुलेआम चालणाऱ्या या अवैध धंद्यांत रोज लाखो रुपयांची बोली लागते, तर लुडो, ताशासह अनेक जुगारांचे खेळ रंगतात. पोलीस अधीक्षकांच्या कठोर कारवाईच्या आदेशाला केराची टोपली दाखवत स्थानिक प्रशासन मात्र अर्थपूर्ण मौन धारण करून आहे. यामुळे संतापलेल्या नागरिकांचा सवाल – “या अवैध सट्ट्याला कोणाचा आशीर्वाद आहे?”

दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या या मंडईत पूर्वी निसर्गपूजा, हत्ती-घोड्यांच्या मूर्तींची पूजा, प्रभातफेरी आणि झाडीपट्टी लोककलांचा जल्लोष असायचा. मात्र आज तेथेच कोंबड्यांच्या झुंजीवर ५० हजार ते २ लाखांपर्यंतची थेट बोली लागते. एका रात्रीत १० ते १५ लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचा दावा स्थानिक नागरिक करतात. “आमचे तरुण या जुगाराच्या आहारी गेले आहेत. घरी पैसेच नाहीत, तरी हजारो रुपये हरले की कर्ज काढून पुन्हा सट्टा लावायला येतात,” अशी खंत एका ग्रामस्थाने बोलून दाखवली.

विशेष म्हणजे, जिल्ह्यात इतरत्र अवैध जुगारांवर छापे पडतात, आरोपींना अटक होते; पण कुरखेडा तालुक्यातील ग्रामीण भागातील एकाही मंडईवर आजपर्यंत कारवाई झालेली नाही. “एसपी साहेबांचे आदेश आहेत, तरीही येथील प्रशासन का डोळे झाकतात?” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

स्थानिक नेते आणि जागरूक नागरिकांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तात्काळ विशेष मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. “देव मंडई ही आमची सांस्कृतिक ओळख आहे. जुगार आणि सट्ट्याला यात स्थान नाही. जर आता कारवाई झाली नाही, तर झाडीपट्टीचा हा अनमोल वारसा कायमचा नष्ट होईल,” असे ते म्हणाले.

आता तरी प्रशासन खडबडून जागे होणार का? की “देव मंडई” कायमची “जुगार मंडई” बनणार? हा प्रश्न कुरखेडा तालुक्यातील प्रत्येक नागरिक विचारतोय!

About The Author

You may have missed

error: Content is protected !!