March 7, 2026

पेसा मोबिलायझरांचा विधानभवनावर भव्य मोर्चा; ग्रामविकास मंत्र्यांना मानधन वाढ व अपघाती विम्याची मागणी करणारे निवेदन सादर

नागपूर, १२ डिसेंबर २०२५: गडचिरोली जिल्ह्यातील पेसा (PESA) कायद्यांतर्गत ग्रामसभा सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या ग्रामसभा मोबिलायझर महिलांच्या संघटनेने आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात विधानभवनावर भव्य मोर्चा काढला. “पेसा ग्रामसभा मोबिलायझर संघटना, गडचिरोली जिल्हा”च्या शेकडो  मोबिलायझरांनी एकत्र येऊन माननीय ग्रामविकास मंत्री श्री. अजयकुमार गोरे यांना थेट निवेदन सादर केले.

मोर्चेकरी महिलांनी आपल्या प्रमुख मागण्या खणखणीतपणे मांडल्या:

– सध्याचे अत्यंत कमी मानधन किमान १०,००० रुपये किंवा महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतनाप्रमाणे करावे
– बचत गटाऐवजी थेट बँक खात्यात मानधन जमा करण्याची व्यवस्था करावी (सद्या बँक कर्जामुळे पैसे मिळत नाहीत)
– प्रत्येक मोबिलायझरला १० लाख रुपयांचे अपघाती विमा कवच द्यावे

संघटनेच्या अध्यक्षा सौ. निकिता नानाजी मडावी यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात उपाध्यक्षा अमिता नहामूर्ते, सचिव दुर्गाबाई वरखडे, कोषाध्यक्ष सुमन हलामी, संघटक पंचफुला उसेंडी आदींसह शेकडो मोबिलायझर सहभागी झाल्या होत्या.

“आम्ही दुर्गम डोंगरात, जंगलात ग्रामसभांना बळकट करतो, आदिवासी समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस झटतो; पण अपुऱ्या मानधनामुळे कुटुंब चालवणे अवघड झाले आहे,” अशी भावना मोर्चेकरी महिलांनी व्यक्त केली.

मोर्चानंतर ग्रामविकास मंत्र्यांनी निवेदन स्वीकारले असून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभा सक्षमीकरणाच्या लढ्यात कार्यरत असलेल्या या महिलांचा हा आवाज आता संपूर्ण महाराष्ट्रात घुमला आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!