March 7, 2026

ऑफलाइन निविदांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप; नगरसेवकाची ऑनलाइन प्रक्रियेची मागणी

“कुरखेडा नगर पंचायतमध्ये नगरोत्थान योजनेच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता; नगरसेवकाची जिलाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांकडे बेकायदेशीर निविदा रद्द करण्याची मागणी”

कुरखेडा (जि. गडचिरोली), २० डिसेंबर : नगर पंचायत कुरखेडा येथे महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान योजना व नागरी दलीतेत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत २०२५-२०२६ साठी ३ नोव्हेंबर २०२५ रोजी काढण्यात आलेल्या निविदा सूचना बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत प्रभाग क्र. १४ चे नगरसेवक अॅड. उमेश नेवाजी वालदे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला आहे.

तक्रारीनुसार, या निविदा सूचना नगर पंचायतच्या सभागृहातील सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीने काढण्यात आल्या आहेत. ४ डिसेंबर २०२५ च्या सर्वसाधारण सभेत याबाबत विचारणा केली असता मुख्याधिकारी अनुपस्थित होते, तर बांधकाम अभियंत्याने निविदा काढल्याची माहिती दिली. यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. अध्यक्षांनीही सभागृहासमोर याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

तसेच, निविदा सूचना कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या नाहीत. जावक रजिस्टरमध्ये फक्त “संपादक” असे लिहिले असून वृत्तपत्राचे नाव नाही. नगर पंचायतच्या नोटीस बोर्डवरही निविदा सूचना लावण्यात आलेल्या नाहीत.

नगरसेवक वालदे यांनी आरोप केला की, ही ऑफलाइन निविदा प्रक्रिया अध्यक्ष, उपाध्यक्ष व काही निवडक ठेकेदार सदस्यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक लाभासाठी बेकायदेशीरपणे काढली आहे. त्यामुळे सदर निविदा प्रक्रिया पूर्णतः रद्द करण्यात यावी व ती ऑनलाइन पद्धतीने पार पाडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तक्रार अर्जाची प्रत जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनाही पाठवण्यात आली आहे. याबाबत मुख्याधिकारी व नगर पंचायत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!