March 7, 2026

गडचिरोलीत २६ डिसेंबरला जिल्हास्तरीय पशुप्रदर्शन; शेतकरी-पशुपालकांना मोफत नोंदणीची संधी

गडचिरोली, डिसेंबर १६  : पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनाचे आयोजन येत्या २६ डिसेंबर २०२५ रोजी गडचिरोली तालुक्यातील मौजा कनेरी (पारडी) येथील प्रियंका हायस्कूल समोरील शंकरपटाच्या मैदानावर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांसाठी ही सहभागाची उत्तम संधी असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या प्रदर्शनात गाय-म्हैस वर्ग, शेळ्या, कुक्कुटपालन आदी पशुधनाचा समावेश राहील. सहभागी पशुपालक आपल्या पशुधनाची नि:शुल्क नोंदणी करून प्रदर्शनात भाग घेऊ शकतील. पशुपालन क्षेत्रातील प्रगतीला चालना, सुधारित पशुसंवर्धन पद्धतींचा प्रसार आणि गुणवत्तापूर्ण पशुधनाला प्रोत्साहन देणे, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.

प्रदर्शनाच्या दिवशी सकाळी ८ ते ११ या वेळेत पशुधनाची नोंदणी होईल. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १२ या कालावधीत उत्कृष्ट पशुधनाची निवड केली जाईल. या वेळी मान्यवरांचे मार्गदर्शन शेतकरी व पशुपालकांना मिळेल. निवड झालेल्या उत्कृष्ट पशुधनासाठी बक्षीस वितरण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्व शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) डॉ. गणेश मेश्राम यांनी केले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!