October 22, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

भाजप नेत्यावर १ कोटी अब्रूनुकसानीचा दावा; निविदा वादात सदस्यत्व जाणार?

“कुरखेडा नगर पंचायतीत निविदा घोटाळ्यावरून युद्ध: अध्यक्ष-उपाध्यक्षांकडून १ कोटीच्या अब्रूनुकसानीचा दावा, नगरसेवक वालदे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस!”

कुरखेडा (गडचिरोली), २३ डिसेंबर *: नगर पंचायत कुरखेडा येथे बांधकाम निविदा प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादाने आता वैयक्तिक आणि पक्षीय पातळीवर तीव्र रूप धारण केले आहे. भाजपचे नगरसेवक अॅड. उमेश वालदे यांनी अध्यक्ष अनीताताई बोरकर आणि उपाध्यक्ष बबलूभाई हूसैनी यांच्यावर आर्थिक लाभासाठी नियमबाह्य निविदा काढल्याचा आरोप केला असून, यावरून आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्षांनी जोरदार प्रत्युत्तर देत १ कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची धमकी दिली आहे. इतकेच नव्हे, वालदे यांचे नगर पंचायत सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याचेही उपाध्यक्षांनी जाहीर केले.

महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान आणि नागरी दलीत एत्तर वस्ती सुधार योजना २०२५-२६ अंतर्गत नगर पंचायतीकडून सुमारे २ कोटी रुपयांच्या बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेवरून हा वाद पेटला आहे. अॅड. वालदे यांनी विविध प्रसिद्धी माध्यमे, सोशल मीडिया आणि प्रशासनाकडे लेखी तक्रारी करून आरोप केला की, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काही निवडक कंत्राटदार सदस्यांनी आर्थिक लाभासाठी नियमबाह्य निविदा सूचना काढल्या आहेत. यावर बोलताना अध्यक्ष अनीताताई बोरकर म्हणाल्या, “हे आरोप पूर्णतः बिनबुडाचे असून, आमची समाजातील प्रतिमा मलीन करण्याचा हेतू आहे. तक्रारदाराने सबळ पुरावा सादर करावा किंवा जाहीर माफी मागावी; अन्यथा १ कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू.”

पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष बबलूभाई हूसैनी यांनी स्पष्ट केले की, निविदा प्रक्रिया ही पूर्णतः प्रशासनाची जबाबदारी असते. “पदाधिकारी फक्त सभागृहात प्रक्रियेचे निरीक्षण करून मंजुरी देतात. ही प्रक्रिया नियमानुसार असल्याने स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, या आरोपांमुळे समाजात चुकीचा समज निर्माण होत असून, आमची प्रतिमा खराब होत आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, भाजप गटनेता म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे, पण वालदे यांनी पूर्वपरवानगीशिवाय आणि पक्षाच्या निदर्शनात न आणता हे आरोप केले आहेत. “हे पक्ष शिस्तीचा भंग आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवायांसाठी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे वालदे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करणार आहोत.”

या पत्रकार परिषदेने नगर पंचायतीतील अंतर्गत कलह उघड्या डोळ्यांनी दिसू लागला आहे. एकीकडे निविदा प्रक्रियेवरून नियमबाह्यतेच्या तक्रारी, तर दुसरीकडे पक्षीय शिस्त आणि वैयक्तिक अब्रूचा मुद्दा. सूत्रांच्या मते, हा वाद आता जिल्हा पातळीवर पोहोचण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून चौकशी होण्याची मागणी जोर धरू शकते. वालदे यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!