April 23, 2026

पळून गेलेल्या बायकोने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून; पुलाजवळ अपघात दाखवण्याचा प्रयत्न फसला

 

“प्रियकरासोबत पळून गेलेल्या पत्नीने पतीची निर्घृण हत्या; दुर्घटना दाखवण्याचा डाव फसला, रेखा उर्फ सोनी आणि विश्वजीत सांगोळे पोलिसांच्या जाळ्यात”

कुरखेडा (गडचिरोली), ३१ डिसेंबर  – अवघ्या काही वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाहाने संसार थाटलेल्या जोडप्यातील प्रेम संपले आणि ते प्रेमाच्या नावाने निर्घृण हत्येत बदलले. गेवर्धा येथील देवानंद सूर्यभान डोंगरवार (वय ३२) यांची त्यांची पत्नी रेखा उर्फ सोनी देवानंद डोंगरवार आणि तिचा प्रियकर विश्वजीत सांगोळे यांनी मिळून हत्या करून, सती नदीवर नवीन पुलाच्या बांधकाम रस्त्यावर अपघाताचा देखावा तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्ताच्या ठशांनी हा खेळ उघडा पडला आणि दोघेही पोलिसांच्या तावडीत सापडले. या खळबळजनक घटनेने परिसरात हादरा उडाला आहे.

२०१८ मध्ये देवानंद याने आंधळी येथील युवती रेखा उर्फ सोनी हिच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला संसार आनंदाने सुरू होता, पण काही काळानंतर राजोली येथील विश्वजीत सांगोळे याच्या संपर्कात आलेल्या रेखाने दोन महिन्यांपूर्वी घर सोडले. विश्वजीत हा गेवर्धा येथील महामार्ग बांधकाम कंपनीत वाहनचालक म्हणून काम करतो आणि त्याच कंपनीच्या बेस कॅम्पमध्ये राहतो, अशी प्राथमिक माहिती आहे.

दोघे कुरखेडा येथील रणप्रताप वार्डात एकत्र राहू लागले. व्यथित झालेल्या देवानंदने पत्नीला परत येण्यासाठी कित्येकदा समजावले. प्रकरण तंटामुक्त समितीपर्यंत पोहोचले, पण रेखाने उपस्थित राहण्यास नकार दिला. फोनवरही समजावणी केली, तरी तिने “आता देवानंदसोबत संसार करायचा नाही” अशी ठाम भूमिका घेतली. समितीने विवाहबंधनातून मुक्त करण्याचा सल्ला दिला, मात्र रेखाने आंतरजातीय विवाहासाठी मिळालेल्या ५० हजार रुपये मला दिल्या नंतरच सोडचिठ्ठी देईन, अशी अट घातली.

देवानंद नेहमीच कुरखेड्यात पत्नीकडे जाणे-येणे करायचा. घटनेच्या दिवशी दुपारी तो पुन्हा तिच्या घरी आला. रात्री तिघांमध्ये जोरदार वाद झाला. भांडण इतके टोकाचे झाले की, देवानंदच्या डोक्यावर प्रहार करून त्याची हत्या करण्यात आली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने घाबरलेल्या रेखा उर्फ सोनी आणि विश्वजीत सांगोळे यांनी देवानंदचा मृतदेह त्याच्याच मोटारसायकलने सती नदीवर नवीन पुलाच्या बांधकाम रस्त्याच्या बाजूला नेला. तेथे मृतदेह फेकून मोटारसायकल तोडून अपघात झाल्याचा देखावा तयार केला.

पण हा डाव फसला! घरापासून पुलापर्यंत रस्त्यावर पडलेल्या रक्ताच्या ठशांनी पोलिसांना घटनेचा छडा लावण्यास वेळ लागला नाही. कुरखेडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रेखा उर्फ सोनी देवानंद डोंगरवार आणि विश्वजीत सांगोळे यांना ताब्यात घेतले. शव विच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे.

देवानंद हा कुटुंबातील एकटाच मुलगा होता. दोन बहिणींचा विवाह झाला आहे, आईचे निधन झाले असून तो वडील आणि आजीसोबत गेवर्ध्यात राहायचा. घटनेची माहिती मिळताच वडील रात्रीच ओळख पटवण्यासाठी आले. या हत्येने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. प्रेम, विश्वासघात आणि हत्येच्या या त्रिकोणाने परिसरात खळबळ माजवली आहे. अशा घटना समाजाला काय संदेश देतात, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!