नियमबाह्य निविदा प्रकरणात ट्विस्ट: उपाध्यक्षांनी स्वपक्षीय नगरसेवकाला पाठवली कोटीची नोटीस
कुरखेडा (गडचिरोली), ५ जानेवारी : नगरपंचायतीच्या निविदा प्रक्रियेवरून राजकीय वादळ उठले आहे! नगरपंचायत कुरखेडाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे नेते मो. कलाम पिरमोहमंद शेख (बबलुभाई हुसैनी) यांनी स्वपक्षीय विरोधी नगरसेवक अॅड. उमेश नेवाजी वालदे यांना कायदेशीर नोटीस धाडली आहे. कारण? निविदा बेकायदेशीर असल्याचा आरोप करून वृत्तपत्रात आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा नोटीसमध्ये म्हटले आहे. दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी काढलेल्या महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान आणि नागरी दलीतेतर वस्ती सुधार योजनेच्या निविदा बेकायदेशीर असल्याची तक्रार वालदे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी १९ डिसेंबरला स्पष्ट खुलासा दिला की, निविदा पूर्ण नियमानुसार आणि अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या संमतीने काढल्या गेल्या आहेत, कोणतीही अनियमितता नाही.
तरीही, दि. २३ डिसेंबर २०२५ च्या ‘देशोन्नती’ दैनिकात ‘नियमबाह्य काढलेल्या निविदा रद्द कराव्यात’ या मथळ्याखाली बातमी छापली गेली. त्यात थेट आरोप करण्यात आला की, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काही निवडक ठेकेदार सदस्यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीर निविदा काढल्या! हा मजकूर भाजपच्या तालुका ग्रुप आणि नगरपंचायतच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरही व्हायरल करण्यात आला.
यामुळे शेख यांची पक्षात, समाजात आणि व्यवसायात प्रचंड बदनामी झाल्याचा दावा नोटीसमध्ये आहे. ३० वर्षांच्या कापड व्यवसायावर आणि सामाजिक प्रतिमेवर आघात झाला असून, लोक संशयी नजरेने पाहू लागले आहेत. नोटीसमध्ये वालदे यांना फौजदारी मानहानीचा गुन्हा आणि १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी आहे.
नोटीस प्राप्त झाल्यापासून ७ दिवसांत जाहीर लेखी माफी मागून प्रमुख वृत्तपत्रांत ठळक प्रसिद्धी द्यावी आणि १ कोटी रुपये देऊन पावती घ्यावी, अन्यथा दिवाणी-फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कुरखेड्यातील हे प्रकरण आता राजकीय रंग घेऊ लागले आहे. एकीकडे उपाध्यक्ष, दुसरीकडे निविदा पारदर्शकतेची मागणी करणारे नगरसेवक – कोणाची बाजू खरी ठरेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!
