DMF ‘प्रमा’ कथित ४ कोटी घोटाळ्याची SIT चौकशी करा; जिल्हाधिकारी व खनिकर्म अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा : आजाद समाज पार्टी
“पत्रकार परिषदेत गंभीर आरोप; निष्पक्ष चौकशी न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा”
गडचिरोली | प्रतिनिधी | ४ जुलै २०२६ : गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या DMF “प्रमा” कथित ४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची संपूर्ण, निष्पक्ष व उच्चस्तरीय विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीने केली आहे. कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे तसेच कथित खोट्या स्वाक्षऱ्यांमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला. अशा प्रकारचे व्यवहार यापूर्वीही झाले असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी जिल्हाधिकारी आणि खनिकर्म अधिकारी या दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवून स्वतंत्र SIT मार्फत तपास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
आजाद समाज पार्टीने या प्रकरणात केवळ एका व्यक्तीची भूमिका नसून प्रभावशाली राजकीय व्यक्ती आणि काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साखळीचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे तपास एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण प्रशासकीय साखळी आणि संबंधित राजकीय व्यक्तींचीही चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे पक्षाने नमूद केले.
पत्रकार परिषदेत आशिष पिपरे यांचे विविध राजकीय पक्षांतील नेत्यांशी संबंध असल्याची चर्चा असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका असून स्वतः आशिष पिपरे हे काँग्रेस गटातून स्वीकृत नगरसेवक असल्याचा दावा करण्यात आला. तसेच भाजपकडून त्यांची तीन महिन्यांपूर्वी हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी या संपूर्ण प्रकरणामुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे पक्षाने म्हटले.
याचबरोबर एवढ्या गंभीर स्वरूपाच्या कथित आर्थिक गैरव्यवहारानंतरही काँग्रेस पक्षाने अधिकृत भूमिका घेतलेली नसल्याचा आरोपही करण्यात आला. दोन्ही प्रमुख पक्षांच्या मौनामुळे जनतेमध्ये विविध शंका निर्माण होत असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीस तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करताना, गेल्या काही दिवसांपासून तपास सुरू असूनही इतर संभाव्य जबाबदार व्यक्तींची नावे समोर न आल्याने तपासाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे आजाद समाज पार्टीने म्हटले.
पक्षाने स्पष्ट इशारा देत सांगितले की, या प्रकरणाची निष्पक्ष, वेळबद्ध आणि पारदर्शक SIT चौकशी झाली नाही अथवा तपास दडपण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल.
पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राज बनसोड, प्रदेश सचिव (विदर्भ) धर्मानंद मेश्राम, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, जिल्हा कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, जिल्हा सचिव सुरेश वासनिक, बार मीडिया प्रभारी सतीश दुर्गम, युवा तालुकाध्यक्ष नितेश वेस्कडे तसेच प्रतीक डांगेउपस्थित होते.
