December 23, 2024

गडचिरोली येथे ३०० आपदा मित्रांचे प्रशिक्षण पुर्ण, आपत्तीमधे प्रशासनाला होणार मदत

1 min read

गडचिरोली,(जि एन एन)दि.09:- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण न्यु दिल्ली,महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे संयुक्त विद्यमानाने गडचिरोली जिल्हयातील आपत्तीप्रवण तालुक्यातील गावातील युवक-युवती तसेच नेहरु युवा केन्द्र,गडचिरोली यांचे विभागातील आपत्ती व्यवस्थानात कार्य करणेस इच्छुक युवक-युवती यातुन असे एकुण 300 स्वयंसेवकांना नावे निश्चित करुन सदर प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 13 डिसेंबर 2022 ते 01 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये 4 बॅचमध्ये शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड गडचिरोली येथे निवासी स्वरुपाचे देण्यात आले.

प्रशिक्षणामध्ये सर्व प्रशिक्षणार्थी यांना आपत्ती व्यवस्थापन तज्ञ यांचे कडुन खालील विषयावर प्रशिक्षीत करण्यात आले ज्यामध्येDRR शब्दावली, आपत्ती, आणीबाणी ,धोका, आपत्तीचे प्रकार,आपत्ती आणी आपत्कालीन व्यवस्थापन, सायकल फ्रेमवर्क, धोरण, संस्थात्मक यंत्रणा,घटना प्रतिसाद प्रणाली, आपदा मित्राची भुमिका आणि जबाबदारी आणि भविष्यातील फ्रेमवर्क इत्यादी, हवामान बदल,आपत्ती भूकंप,भूस्खलन,पूर त्सुनामी, चक्रीवादळ,विज पडणे,दुष्काळ, उष्णतेच्या लाटा,शितलहरी, प्रथमोपचार, व्याख्या, भुमिका आणि जबाबदारी,समुदाय मुल्यांकन, BLS कृत्रिम श्वासोच्छवास तंत्र,चोकींग, इमरजन्सी लिफटींग आणि हलवण्याच्या पध्दती, फायर सेफटी,फॉरेस्ट आणि फार्म फायर हायड्रेंट आणि इतर आगाऊ यंत्रणा, आण्वीक, जैविक, रासायनिक आपत्ती, समुदाय मुल्यांकन, गर्दी व्यवस्थापन, मानवी शरीर प्रणाली, बँडेज, सुधारीत स्ट्रेचर,आग प्रात्यक्षिक, पीपीई सुट आणि इतर सुट ऑपरेशन, जखमा, रक्तस्त्राव, फ्रॅक्चर, बर्न्स आणि स्कॅल्डस,प्राणी,किटक, साप चावणे, रिव्हर क्रॉसिंग, क्षेत्रभेट, पूर बाधीत सराव, दोरी बचाव, प्रथमोपचाराचे सराव सत्र, व्यावहारीता प्रात्यक्षिक पथनाटय सराव, शोध व बचावाचे सराव सत्र, नॉटसचे सराव सत्र, BLS चे सराव सत्र, इत्यादी विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले.

गडचिरोली जिल्हयातील आपत्ती प्रवण तालुक्यातील तसेच गावातील स्वयंसेवकांना आपदा मित्र प्रशिक्षण देण्यात आले आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सिरोंचा, भामरागड, अहेरी, आरमोरी, वडसा, गडचिरोली, चामोर्शि तालुक्याचा समावेश आहे तसेच इतर तालुक्यातील स्वयंसेवकांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व आपदामित्रांचा शासनाकडुन 3 वर्षाकरीता 5 लक्ष रुपयाचा विमा काढण्यात आलेला असुन सर्व आपदा मित्रांना जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे कामाकरीता ओळखपत्र, प्रमाणपत्र, आपदा किट देण्यात आले आहे. एकुण 300 आपदा मित्रा मध्ये 59 मुली तसेच 241 मुले आहेत. आपदा मित्रांची अधिकृत यादी गडचिरोली जिल्हयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच तालुकानिहाय यादी सर्व तहसिलदार यांना पाठविण्यात आलेली आहे. सदर आपदा मित्रांना आपत्ती प्रवण गावातील नागरीक तसेच प्रशासनामध्ये दुवा म्हणुन काम करावयाचे असुन आपत्तीमध्ये फर्स्ट रिस्पांडन्ट ची भुमिका निभावयाची आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा, निवासी उपजिल्हाधिकारी,समाधान शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येऊन आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेडडी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, वरिष्ठ लिपीक आपत्ती व्यवस्थापन शाखा स्वप्नील माटे, विजय मोनगुलवार यांचे उपस्थितीत पार पडले.

About The Author

error: Content is protected !!