“खादी ग्रामोद्योग आयोगाचे संचालक राघवेंद्र महिन्द्रकर यांची देवराई कलाग्रामला सदिच्छा भेट”
1 min readभामरागड,(प्रतिनिधी) १६ फेब्रुवारी; तालुक्यात धातूकाम,बांबू- काम व लाकूड कामासाठी प्रसिद्ध देवराई कलाग्रामला खादी ग्रामोद्योग आयोगाचे नागपूर विभागीय संचालक राघवेंद्र महिन्द्रकर यांनी १६ फेब्रुवारी २०२३ ला सदिच्छा भेट दिली.
भामरागड तालुक्यात सुरेश पुंगाटी या होतकरू तरुणाने कारागिर लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच युवक-युवतींना कारागिरी शिकता यावी या उदात्त हेतूने ‘ देवराई कलाग्राम ‘ नावांनी संस्था सुरु केली.यामध्ये धातू,बांबू व लाकडाच्या सुबक मुर्ती, विविध कलाकुसर, दागिने व कलात्मक वस्तू तयार केल्या जातात.अनेक युवक-युवतींना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते.प्रशिक्षणानंतर युवक-युवतींनी लघू उद्योग सुरू करुन स्वयंरोजगार करावे व सक्षम व्हावे हा उद्देश आहे.आजतागायत अनेकांना प्रशिक्षित करुन देवराई कलाग्रामने कारागिरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.सध्या या उपक्रमाची माहिती सर्वत्र पसरत आहे.
खादी ग्रामोद्योग आयोगाचे नागपूर विभागीय संचालक राघवेंद्र महिन्द्रकर यांना देवराई कलाग्रामबद्दल माहिती मिळाली.त्यांनी १६ फेब्रुवारी २०२३ ला त्यांच्या केंद्रीय कार्यालय,खादी ग्रामोद्योग आयोगाच्या महिला सशक्तीकरण कमिटी, मुंबईच्या चमू सोबत देवराई कलाग्रामला सदिच्छा भेट दिली.येथील लाकडांवरील कोरीवकाम,धातूपासून बनविलेल्या कलाकुसरीच्या विविध वस्तू, धातूंच्या मुर्ती व बांबू काम पाहून देवराई कलाग्रामचे संचालक व त्यांच्या कारागिरांचे कौतुक केले.खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे येथील युवक-युवतींकरिता नागपूरला प्रशिक्षण ठेवू असे आश्वासनही यावेळी दिले. राघवेंद्र महिंद्रकर यांचेसह मुंबई येथील केंद्रीय खादी ग्रामोद्योग आयोगाच्या उपसंचालिका तथा महिला सशक्तीकरण कमिटीच्या श्रीमती पिंकी भारती, अनिता हातोळे, मुग्धा भोकटे, अक्षाली वैत्य, अपराजित गुप्ता व निशा सोनेकर आदी महिलांनी देवराई कलाग्रामला सदिच्छा भेट दिली.या भागातील महिलांना लघू उद्योगांकरीता मदत व प्रोत्साहन देण्यासाठी आमचा सर्व्हे सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
देवराई कलाग्राममधील प्रत्येक मूर्तीचा व विविध कलात्मक वस्तूंचा इतिहास कलाग्रामचे संचालक सुरेश पुंगाटी व प्रशिक्षक सोमेश मडावी यांनी सांगितला.यावेळी प्रशिक्षक चंद्रा पुंगाटी, मोतीराम गावडे, संतोष नाग तसेच प्रशिक्षणार्थी युवक-युवती उपस्थित होते.