December 23, 2024

“’त्या’ २० गावांना करावा लागतो नदीपात्रातून धोकादायक प्रवास”

1 min read

“पुलाअभावी डोंग्यातून गाठतात तेलंगणातील शहरे”

गडचिरोली; (प्रतिनिधी) ०४ मार्च : सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा परिसरात २० गावे वसलेली आहेत. ही गावे तालुका मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर आणि जिल्हा मुख्यालयापासून २५० किमी अंतरावर आहेत. या गावांना डोंगराखालची गावे म्हणून ओळखले जाते. या परिसरात महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरून बारमाही वाहणाऱ्या प्राणहिता नदीवर पूल नाही. त्यामुळे नागरिकांना नदीतून तब्बल ३ किमी अंतर पार करत पैलतीर गाठावा लागतो. यातून दरवर्षी एक-दोन अपघाताच्या घटना घडत असतात.

या परिसरात पूर्णपणे तेलुगू भाषिक लोक आहेत. या परिसरात अनेक समस्या आहेत. दहावीपर्यंत एकच हायस्कूल आहे, दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामध्ये रिक्त पदे आणि औषधींचा तुटवडा असतो. हंगामी शेती हेच रोजगाराचे साधन आहे. परिणामी या भागातील लोकांना वारंवार शेजारील तेलंगणा राज्यात धाव घ्यावी लागते.

महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या रेगुंठा परिसरात कोटापल्ली आणि तेलंगणातील शेवटचे गाव वेमनपल्ली या दोन गावांना जोडणारा पूल प्राणहिता नदीवर उभारल्यास रेगुंठा परिसरासह लाखाचेन, व्यंकटापूर परिसरातील २० गावांना आणि जिमलगट्टा, उमानूर परिसरातील ५० गावांना तेलंगणा राज्यात ये-जा करण्यासाठी सोयीचे होईल. तेलंगणा राज्यातील जवळपास १०० गावांतील नागरिकांनासुद्धा या पुलामुळे सोय होईल.

दररोज २५० ते ३०० लोकांचा डोंग्यातून प्रवास

तेलंगणा आणि महाराष्ट्र सीमेवर असलेली प्राणहिता नदी १२ महिने वाहते. त्यामुळे दररोज २५० ते ३०० नागरिकांना डोंग्यातून (नावेने) प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात तर ही नदी पूर्ण भरून वाहते. पर्याय नसल्यामुळे लोक अगदी जीव धोक्यात घालून नदी पार करतात.

रेगुंठा परिसरात दवाखाना नसल्यामुळे गरोदर महिला आणि इतर रुग्णांना याच नदीच्या मार्गे तेलंगणा राज्यातील दवाखान्यात जावे लागते.

पुलाची उभारणी झाल्यास जड वाहनांच्याही सोयीचे

कोटापल्लीपासून २५ किमी अंतरावर आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग आणि अहेरी-कोटापल्ली आणि कोटापल्ली-टेकडा असे तीन मुख्य मार्ग आहेत. कोटापल्ली गावाजवळ प्राणहिता नदीवर पुलाची निर्मिती झाल्यास सिरोंचा-आलापल्ली या राष्ट्रीय मार्गावरून चालणाऱ्या जड वाहनांना कोटापल्ली-वेमनपल्ली मार्गाने तेलंगणा राज्यातील शहरांना जाण्यासाठी सोयीचे ठरू शकते. कोटापल्लीवरून मंचिरियलला ७० किमी अंतरावर असून मंचिरियलपासून रेल्वेमार्ग असल्याने नागरिकांना अनेक सोयी-सुविधा मिळतील.

About The Author

error: Content is protected !!