“खरकाडा येथील हर्षदा आत्महत्या प्रकरणात : चौघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी); १५ मार्च : तालुक्यातील खरकाडा येथे नवविवाहीतीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी मृतक महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती, सासू, सासरा व दिराला अटक केली होती. पोलिसांनी चारही आरोपींना कुरखेडा न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायाधीशांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीचा निर्णय दिला आहे.
देसाईगंज तालूक्यातील बोडधा येथील हर्षदा गायकवाड हिचा विवाह मागील वर्षी १९ एप्रील २०२२ रोजी खरकाडा येथील महेश बंसोड याचाशी झाला होता. दरम्यान, हर्षदाने आपल्या सासुरवाडीतच आत्महत्या केली. याप्रकरणी मृतक मुलीच्या वडिलांनी आपल्या मूलीला शारिरीक व मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याची तक्रार कुरखेडा पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. या प्रकरणात आरोपी पती महेश बाबूराव बंसोड, सासरा बाबुराव ऋषी बंसोड, सासू उषाबाई बाबूराव बंसोड व दिर प्रणय बाबूराव बंसोड या चार जणांविरोधात भारतिय दंड संहिता १८६० चा कलम ३०४ ब,३०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करीत सोमवारी सकाळी चौघांनाही अटक करण्यात आली होती. सदर आरोपींना बुधवारी न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार आरोपींची चंद्रपुरातील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.