December 23, 2024

“शेकडो शेतकऱ्यांचा नंदु नरोटेच्या नेतृत्वात मालेवाडा वीज वितरण कंपनीवर धडक मोर्चा”

1 min read

“विविध मागण्यांचे उपविभागीय अभियंत्यांना निवेदन केले सादर”

देसाईगंज; (प्रतिनिधी); २३ एप्रिल: अतिदुर्गम, अतिसंवेदनशील भागात वारंवार करण्यात येत असलेल्या खंडित वीजपुरवठ्यामुळे घरगुती वीज ग्राहकासह शेतकऱ्यांचे कृषी पंप प्रभावीत झाल्याने रब्बी हंगामात लावलेले धान पिक व इतरही पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.विद्युत भारनियमनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याने त्या समस्येवर यथाशिघ्र तोडगा काढण्यात यावा,या मागणीला घेऊन आविसचे सरसेनापती नंदु नरोटे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांचा धडक मोर्चा मालेवाडा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकला.
राज्य शासनाने जाहिर केल्याप्रमाणे दिवसा किमान १२ तास सुरळीत वीज पुरवठा न करता वारंवार भारनियमन केले जात आहे.राज्याचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस यांनी विरोधात असताना वारंवार आंदोलन करून, प्रसंगी सभागृहाला धारेवर धरून मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर वीज पुरवठा करण्याची मागणी लावून धरली होती.माञ सत्तेत येताच आपल्याच मागणीचा विसर पडल्याने फडणविस यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप करीत तीच मागणी पुर्ण करण्यासाठीचे हे आंदोलन असल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना वीज पुरवठा करण्यासह विविध मागण्यांचे येथील महावितरण वीज कंपनीचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन सादर करण्यात आले.यात प्रामुख्याने मालेवाडा व पुराडा क्षेत्रातील लोडशेडिंग तत्काळ बंद करण्यात यावी,तेलंगण सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज व पाणी पुरवठा करण्यात यावा, शेतकरी व कृषी वीज पुरवठ्याचे बील कमी करण्यात यावे,शेतकऱ्यांचे बंद असलेले वीज मिटर तत्काळ बदलून देण्यात यावे,रिडींग न घेता वीज बिल देणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, डिमांड भरलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना वीज मिटर देण्यात आले नाही त्यांना यथाशिघ्र मिटर देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
आयोजीत धडक मोर्चा आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपुर,तालुका शाखा कुरखेडा,उपशाखा मालेवाडाच्या वतीने येथील हनुमान मंदिरा पासुन काढण्यात आला.निवेदन उपकार्यकारी अभियंता बोरकुटे यांनी स्विकारले.
यावेळी कुरखेडा पंचायत समितीचे माजी सदस्य तुळशीदास बोगा,जेष्ठ नेते बालाजी ठाकरे,मालेवाडाच्या सरपंचा अनुसया पेंदाम,माजी सरपंच आनंद बोगा, चर्विदंडच्या सरपंच भुपाल कुमरे,देसाईगंज तालुका महिला काँग्रेसच्या समिता नंदेश्वर,पुष्पा कोहपरे, आंविसचे सदाराम काटेंगे, काशिनाथ कुमोटी,चेतन काटेंगे,अंगाऱ्याचे ञ्यंबक पा. नाकाडे,दादाजी सुकारे, विकास कुमरे, रोशन कुमरे, सुरसुंडीच्या सरपंचा सरीता कुमोटी,दराचीच्या सरपंचा रंजना नरोटे,आयेशा शेख आदी पुराडा,मालेवाडा क्षेत्रातील पदाधिकारी, आंविसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!