“कुरखेडा तालुक्यातील दारू विक्री विरोधात महिलांचा एल्गार; भर पावसात दारुविक्रेत्यांच्या घरावर धडक”
1 min read“नान्ही येथील विक्रेत्यांना दिला कायदेशीर कारवाईचा इशारा ; दोन दिवसात गावातील दारू विक्री बंद न झाल्यास कुरखेडा पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्याची चेतावणी”
गडचिरोली; (प्रतिनिधी); ३ मे: कुरखेडा तालुक्यात दारू विक्री जणू अधिकृत असल्या सारखीच आहे. अनेक युवक या व्यसनाच्या अधीन जावून त्यांचे आयुष्य उध्वस्त झालेले आहे. पोलिस विभागातील काही भ्रष्ट कर्मी या दारू विक्रेत्यांना संगनमत करून दारू विक्रीस छुपी संमती देत असल्याचे चित्र आहे.
कुरखेडा तालुक्यातील नान्ही येथील दारूविक्रेत्यांना वारंवार सूचना करूनही त्यांनी आपला अवैध व्यवसाय बंद केला नाही. यामुळे संतप्त झालेल्या मुक्तीपथ दारूमुक्त संघटनेच्या महिलांनी भर पावसात विक्रेत्यांच्या घरावर धडक देऊन अहिंसक कृती केली. सोबतच दारूविक्री न थांबविल्यास कायदेशीर कारवाईचाही इशारा दिला आहे.
गावात 5 ते 6 दारू विक्रेते असून चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय करतात.या गावात चिचटोला व धमधीटोला येथील मद्यपी प्यायला येतात. तसेच कुरखेडा येथे काही ठिकाणी दारूची तस्करी सुद्धा करतात. गावातून दारू हद्दपार करण्यासाठी संघटनेच्या महिलांनी यापूर्वी भरपूर प्रयत्न केले आहेत. अहिंसक कृती करून दारू नष्ट केली. सोबतच विक्रेत्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र, मुजोर विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय बंद केला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा संघटनेनी आक्रमक पवित्र घेतला आहे. त्याअनुषंगाने नान्ही येथे 22 महिलांची संघटना पुनर्गठीत करून संध्याकाळी भरपावसात 5 दारू विक्रेत्यांच्या घरून देशीचे टिल्लू पकडून नष्ट करण्यात आले. तसेच दोन दिवसात दारू विक्री बंद करावी अन्यथा आपनाविरुद्ध कुरखेडा पोलीस स्टेशन येथे पायी आंदोलन करून तक्रार करण्यात येईल. अशी तंबी संघटनेच्या महिलांनी दिली. यावेळी मुक्तीपथ तर्फे मयुर राऊत व कान्होपात्रा राऊत उपस्थित होते.
कुरखेडा मुख्यालय लागत असलेल्या नान्ही हद्दीतील मोठ्या आलिशान हॉटेलात दारूची खुलेआम विक्री होत असून या बाबत अजून पोलिस अनभिज्ञ असल्याने संशय वाढीस आले आहे. तालुक्यातील दारू चे मुख्यालय याच ठिकाणी असल्याची खात्री लायक माहिती आहे. मागील अनेक वर्षापासून येथे सुरू असलेले दारू बाबत कुठलीच कार्यवाही झालेली नाही. रात्रौ अंधारात गोंदिया जिल्ह्यातील केशोरी येथील दारू दुकानातून मोठ्याप्रमाणात दारू येथे पोहोचती केली जाते व याच ठिकाणावरून संपूर्ण जिल्ह्यात पुरवठा होतो. वेळीच या वर कायदेशीर कार्यवाही न झाल्यास नागरिकांनी आक्रमक होवून येथे शिस्त केली तर व्यवस्था कश्यासाठी व कुणासाठी असा मोठा प्रश्न उपस्थित होतो.