December 23, 2024

“आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या ‘उलगुलान’ या निःशुल्क वर्गामुळे आज जिल्ह्यातील एकूण दहा विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे”

1 min read

“नक्षल्यांच्या दहशतीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील ज्या ठिकाणी अजूनही मूलभूत सोयी सुविधा पोहोचल्या नाही. त्या भागातील विद्यार्थ्यांनी यंदा वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा ‘नीट’ उत्तीर्ण केली आहे.”
लोकसत्ता टीीम”

गडचिरोली; (प्रतिनिधी); १५ जून : उस्मानाबाद येथील ‘लिफ्ट फॉर अप्लिफ्टमेंट’ संस्थेने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या ‘उलगुलान’ या निःशुल्क वर्गामुळे आज जिल्ह्यातील एकूण दहा विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
नक्षल्यांच्या दहशतीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील ज्या ठिकाणी अजूनही मूलभूत सोयी सुविधा पोहोचल्या नाही. त्या भागातील विद्यार्थ्यांनी यंदा वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा ‘नीट’ उत्तीर्ण केली आहे. यात नक्षल्यांच्या गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परिसरातील तुरेमर्काचा रहिवासी राकेश पोदाळी आणि बिनागुंडाचा सुरेश पोदाडी याचा समावेश आहे.
स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत देखील गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील बराचसा परिसर मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. नक्षल्यांची दहशत आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हा भाग आजही मागास आहे. परिणामी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतो. घरात अठराविश्व दारिद्र्य आणि सोयी सुविधांचा अभाव यामुळे बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी डॉक्टर होऊ शकले. ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘लिफ्ट फॉर अप्लिफ्टमेंट’ संस्थेचे डॉ. अतुल ढाकणे आणि त्यांच्या चमूने मेळघाटसह गडचिरोली जिल्ह्यातील गरीब आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे(नीट) मोफत निवासी वर्ग चालू केले. या वर्गाला ‘उलगुलान’ असे नाव देण्यात आले.

यावर्षीच्या वर्गातून गडचिरोली जिल्ह्यातील दहा विद्यार्थी एमबीबीएससाठी पात्र ठरले आहे. यात राजु दुर्गम (टेकाडाताल्ला ता. सिरोंचा) पुष्पा जाडी( चिंतादेवाला), आकाश कोडायामी( गावानहेट्टी ता.गडचिरोली ) रोहिणी मांजी (पल्ली ता. भामरागड), सचिन अर्की (गोपनार ता.भामरागड), सुरज पोदाडी (बिनागुंडाता.भामरागड), श्रुती कोडायामी (भामरागड), राकेश पोदाळी(तुरेमर्का ता.भामरागड) अल्तेश मिच्छा( भामरागड), रेणुका वेलादी (अहेरी) यांचा समावेश आहे. यातील काहींच्या गावात तर रुग्णालय आणि डॉक्टर म्हणजे काय हे सुध्दा माहिती नाही.

“आम्ही संस्थेच्या मार्फत मागील आठ वर्षांपासून पुणे व मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उस्मानाबाद येथे ‘उलगुलान’ ही स्वतंत्र मोफत निवासी बॅच चालवतो. २०२०-२१ पासून गडचिरोलीमधील विद्यार्थ्यांसाठी पण प्रवेश देण्यात येत आहे. आमच्या ‘व्हिजन २०३०’ नुसार आम्ही गडचिरोली व मेळघाटातून १०० एमबीबीएस डॉक्टर घडवणार आहोत. पुढील बॅचची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, त्यासाठी ७७२००३३००७ या क्रमांकावर संपर्क करू शकता. -डॉ. सिद्धिकेश तोडकर, कार्याध्यक्ष, लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट”

About The Author

error: Content is protected !!