December 23, 2024

“राष्ट्रसंत तुकडोजी म. स्वच्छ ग्रामस्पर्धेत जिल्हातील ३ ग्रा.पं. प्रथम; मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते पारीतोषिक वितरण”

1 min read

गडचिरोली,(प्रतिनिधी);२४ सप्टेंबर: संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत सन २०२०-२१ व सन २०२१-२२ एकत्रित स्पर्धेत जिल्हास्तरावर अनुक्रमे प्रथम, द्वितिय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या ग्रामपंचायतींना दिनांक २२ सप्टेंबर रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते पारीतोषिक वितरण करण्यात आले. प्रथम तीन क्रमांक मिळालेल्या गडचिरोली पंचायत समिती मधील ग्रामपंचायत दिमना, कुरखेडा पंचायत समिती मधील ग्रामपंचायत बेलगांव खैरी, वडसा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कोंढाळा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्राम सेवक यांचा धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करुन गौरव करण्यात आला.

सदर पुरस्कार अनुक्रमे ५ लाख, ३ लाख व २ लाख रूपयांचा धनादेश, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णा गजबे, माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार, जल जिवन मिशनचे प्रकल्प संचालक फरेंद्र कुतीरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.

सांडपाणी व्यवस्थापनाचा स्व. वसंतराव नाईक विशेष पुरस्कार देसाईगंज पंचायत समितीमधील ग्रामपंचायत पिंपळगांव यांना प्रदान करण्यात आला. पाणी गुणवत्ता व व्यवस्थापनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कुरखेडा पंचायत समितीमधील ग्रामपंचायत सावलखेडा, शौचालय व्यवस्थापनाचा स्व.आबासाहेब खेडकर पुरस्कार कोरची पंचायत समिती मधील ग्रामपंचायत बोरी यांना प्रत्येकी २५ हजार चा धनादेश, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र वितरीत करुन सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे नियोजन जलजिवन मिशनचे प्रकल्प संचालक फरेंद्र कुतीरकर यांनी केले. यावेळी जिल्हा परीषदेचे अधिकारी तसेच कर्मचारी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!