December 23, 2024

प्रोजेक्ट उडाण अंतर्गत अतिदुर्गम भागातील महिला शेतकरी कृषीदर्शन व अभ्यास दौरा सहलीकरीता रवाना

1 min read

गडचिरोली, ०४ जुलै : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पध्दतीने शेती करीत आहेत. त्यामुळे शेती मधुन प्राप्त होणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने त्यांच्या आर्थिक विकासास अडथळा निर्माण होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास अडचण निर्माण होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी जिल्ह्याबाहेर पडून, पारंपरिक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन तेथील परिस्थीतीची, आधुनिक शेती व उपकरणांची पाहणी करतील व त्या ज्ञानाचा वापर करून पारंपरिक शेती पध्दतीत बदल करतील व जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने तसेच ०१ जुलै जागतिक कृषी दिन साजरा करण्यात आला. त्याचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे संकल्पनेतून भामरागड येथून एकुण ५० महिला शेतकऱ्यांकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांचे संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडाण अंतर्गत” चौदाव्या कृषीदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले.

यापूर्वी झालेल्या एकुण तेरा कृषी दर्शन सहल व अभ्यास दौऱ्यांमध्ये दुर्गम भागातील विविध उपविभागातून एकुण ५५० महिला व पुरुष शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या चौदाव्या सहलीमध्ये एटापल्ली, भामरागड व हेडरी उपविभागातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें हद्दीतील अतिदुर्गम भागातील ५० महिला शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या सहली दरम्यान सहभागी महिला शेतकरी वरोरा, वर्धा, घातखेड, बडनेरा, अकोला, शेगाव, जळगाव, वेरुळ येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच विविध शेती प्रक्षेत्र यांना भेटी देणार आहे. तसेच नागपूर येथील लिंबुवर्गीय संशोधन केंद्राला सुद्धा भेट देणार आहे. त्याचप्रमाणे शेतीविषयक अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान जाणुन घेणार आहेत. यामुळे ते प्रगत तंत्रज्ञानाचे अनुभव आपल्या शेती व्यवसायामध्ये वापरून आपली आर्थिक उन्नती साधुन जिवनमान उंचावतील त्यामुळे जिल्ह्यातील विकासात त्यांचे योगदान असणार आहे.

सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनात ०२/०७/२०२४ पासुन ०९/०७/२०२४ रोजी पर्यंत एकुण ०८ दिवस आयोजीत करण्यात आला असून, या चौदाव्या कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा कार्यक्रमास मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!