देशी दारूविक्रेत्यास केले पोलिसांच्या स्वाधीन
1 min readचामोर्शी, 06 जुलै : तालुक्यातील तळोधी मोकासा या गावाला अवैध दारूविक्री मुक्त करण्यासाठी महिलांनी शर्तीचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यामुळे मागील पाच महिने गावातून अवैध दारू हद्दपार झाली होती. परंतु, गावातील काही विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय सुरु केल्याची माहिती मिळताच मुक्तिपथ व गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती करीत एका दारू विक्रेत्याकडून ५ हजार रुपये किमतीची देशी दारू जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन केले.
हे गाव मुख्यालयापासून १० किमी अंतरावर आहे. या ठिकाणी १५ ते २० दारू विक्रेते सर्रास दारू विक्री करीत होते. अवैध दारूविक्रीला कंटाळून महिलांनी ग्रामसभा घेऊन दारूविक्रीबंदीचा ठराव पारित केला. तसेच सर्व दारूविक्रेत्यांना नोटीस देऊन अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्याची तंबी देण्यात आली. यामुळे काही दारू विक्रेत्यांनी दारूविक्री बंद केली. परंतु काही मुजोर विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. त्यामुळे गाव संघटनेने सात दारूविक्रेत्यांना पडकून पोलिसांच्या स्वाधीन केले. तरी काही विक्रेत्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला. यासंदर्भातील माहिती पोलिस अधीक्षक यांना निवेदनातून देण्यात आली असता संबंधित विक्रेत्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली. यामुळे सदर गाव गेल्या पाच महिन्यांपासून अवैध दारूविक्रीमुक्त झाला होता. अशातच गावातील एक विक्रेता चोरट्या मार्गाने दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळताच महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती करण्याचे नियोजन केले. त्यानुसार गाव संघटना व मुक्तिपथने संयुक्त कृती करीत सुनील भांडेकर या विक्रेत्याकडून ५ हजार रुपयाचे देशी टिल्लू पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही दारूबंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी गाव संघटनेच्या महिलांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
यावेळी गाव संघटनेच्या सदस्यांसह मुक्तीपथचे तालुका उपसंघटक आनंद सिडाम, स्पार्क कार्यकर्ती पल्लवी चुधरी उपस्थित होते.