आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा, मुरमाडी येथे कायदेविषयक शिक्षण शिबिर
1 min readगडचिरोली, ०६ जुलै : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे समान किमान कार्यक्रमानुसार माहे जुलै-२०२४ मध्ये बालकांचे हक्क व बेटी बचाओ बेटी पढाओ’ या विषयावर कार्यक्रम घेणेबाबत निर्देश दिलेले होते. त्याअनुषंगाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष विकास एस. कुलकर्णी यांचे आदेशानूसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीतर्फे ०५ जुलै रोजी दुपारी १२.०० वाजता आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा, मुरमाडी येथे कायदेविषयक शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रम घेण्यामागिल उद्देश म्हणजेच बालकांचे मुलभूत अधिकार, बालकांचे संरक्षणाबाबतची योजना, बालकांकरीता कायदेशिर सेवा, बेटी बचाओ बेटी पढाओ अशा विविध विषयावर बालकांकरीता कायदेविषयक शिक्षण शिबिराचे आयोजन आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा, मुरमाडी येथील सभागृहात करण्यात आले. कायदेविषयक शिक्षण शिबिरास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, शाळेचे मुख्याध्यापक एच.एम. चुधरी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जांभुळकर यांनी केले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जयंत जथाडे यांनी उपस्थित विद्यार्थी/विद्यार्थीनींना बालकांचे मुलभूत अधिकार, बाल विवाह, बाल कामगार या बाबत संपुर्ण माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर. पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी/विद्यार्थीनींना बालकांचे मुलभूत अधिकार व बेटी बचाओ बेटी पढाओ, बालमजुरी, बालविवाह तसेच बालकांचे संविधानिक मुलभूत अधिकाराबाबतची माहिती सांगितली व उपस्थित विद्यार्थी/विद्यार्थीनींना दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तूंचे वाटप केले.
कायदेविषयक शिक्षण शिबिराचे संचालन नरूले यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा, मुरमाडीचे शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी वरिष्ठ लिपीक एन.आर. भलमे, एस.के. चुधरी, कनिष्ठ लिपीक जे.एम. भोयर आणि शिपाई एस.डब्ल्यू. वासेकर यांनी अथक परिश्रम घेतले.