“भामरागड परिसरातून दोन जहाल नक्षल्यांना अटक”
1 min readगडचिरोली , ७ जुलै: विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोन नक्षल्यांना भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. रवी मुल्ला पल्लो (वय ३३) रा. कवंडे ता. भामरागड आणि दोबा कोरके वड्डे (वय ३१) रा. कवंडे ता. भामरागड अशी अटकेतील नक्षल्यांची नावे असून, दोघेही भामरागड तालुक्यातील कवंडे येथील रहिवासी आहेत. रवी हा नक्षल्यांच्या अ०क्शन टीमचा कमांडर, तर दोबा हा सदस्य होता. या दोघांवर महाराष्ट्र शासनाने १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील सी-६० पथकाचे जवान धोडराज परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना त्यांनी रवी आणि दोबा यांना संशयास्पद स्थितीत फिरताना अटक केली. नोव्हेंबर २०२३ मध्ये पेनगुंडा येथील दिनेश गावडे या व्यक्तीच्या खुनात दोघांचा सहभाग होता. रवी पल्लो हा २०१६ पासून नक्षल दलममध्ये कार्यरत होता. त्याच्यावर चकमक, जाळपोळ आणि भूसुरुंगस्फोटाचा प्रत्येकी एक, तर खुनाचे तीन गुन्हे दाखल आहेत. रवीवर शासनाने ८ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.
दोबा वड्डे हा २००८ पासून नक्षल्यांना सहकार्य करीत होता. २०१९ पासून तो भामरागड दलममध्ये कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे ५, खुनाचे ७ आणि अन्य ६ असे एकूण १८ गुन्हे दाखल आहेत. दोबावर शासनाने २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी ८९ नक्षल्यांना अटक केली आहे. नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.